💥 इज्तेमातून संपुर्ण देशात शांती व एकात्मतेचा संदेश......!


💥इज्तेमात मुस्लीम बांधवांनी घडवले अभूतपूर्व शिस्तीचे प्रदर्शन💥

जिंतूर प्रतीनिधी  / बि. डी. रामपूरकर

राष्ट्रीय महामार्गावरील पेडगाव (ता.परभणी) शिवारात 7 व 8 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या इज्तेमाचा गुरुवारी रात्री लाखो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मगरीब ची नमाज (सामूहीक प्रार्थना) पठन करुन समारोप झाला.


                         इज्तेमाच्या या समारोपीय दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळपासून परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तालुका स्थानांसह खेड्या-पाड्यातून हजारो मुस्लिम बांधवांचे जथ्येच्या जथ्ये पेडगावात दाखल होत होते. त्यामुळे परभणीच्या विसावा कॉर्नरपासून ते पेडगावपर्यंतचा अंदाजे 14 किलो मीटर पर्यंतचा महामार्ग वाहनांसह नागरीकांच्या गर्दीने अक्षरशः फुललेला होता.

                         पेडगावातील या सोहळ्याच्या स्थळी लाखो बांधवांच्या उपस्थितीने मुख्य मंडप गर्दीने ओसंडून वाहत होता. दुपारपर्यंत या मुख्य मंडपात, शंभर एकराच्या आवारात काना-कोपर्‍यापर्यंत जागा असेल त्या ठिकाणी बांधवांनी ठाण मांडले. पेडगाव रस्त्यावरसुध्दा ध्वनीक्षेपकाद्वारे आवाज येईल तीथपर्यंत मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. हजारो नागरीकांना वाहनांच्या रांगा, गर्दीने या इज्तेमा पर्यंत पोहोचतासुध्दा आले नाही. परंतु, कुठेसुध्दा रेटारेटी झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अतिशय शिस्तबध्द पध्दतीचे दर्शन घडविले. ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच नमाज अदा केली. ठिकठिकाणचे हे दृश्य अभूतपूर्व होते.

                         सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंतच्या सत्रांमधून देशभरातील नामवंत धर्मगुरु व मौलवींनी विविध विषयांच्या अनुषंगाने सुंदर असा उपदेश, सुंदर असे विवेचन केले व इज्तेमातील लाखोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांना सुंदर संदेशही दिला.

इज्तेमाच्या या समारोपाच्या दिवशी आयोजकांबरोबर या समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व संघटनांनी या लाखो नागरीकांकरीता मोफत पाणी पाऊच पासून चहा, नाष्टा, जेवण, फराळ तसेच फळे वितरीत केली. काही ठिकाणी जेवणाची पाकीटही वितरीत करण्यात आली. इज्तेमातील नागरीकांना सर्वतोपरी सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून शेकडो दानशूर व्यक्ती, संस्था व संघटनांनी दोन दिवस अक्षरशः अहोरात्र प्रयत्न केले. विशेष म्हणजे या दोन दिवशीय इज्तेमात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील हजारो स्वयंसेवकांनी तन-मन-धनाने योगदान देवून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.

या इज्तेमातील मुख्य मंडपापासून, कार्यक्रमांपासून ते भोजन, पाणी, स्वच्छता, वीज, पार्कींग, ध्वनीक्षेपक, वैद्यकीय व्यवस्था, स्वागत कक्ष, निवास व्यवस्थासह अन्य व्यवस्थांमधून हजारो स्वयंसेवकांनी नियोजनबध्द पध्दतीने काम करीत आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली. रात्री सूर्यास्तानंतर मगरीब ची नमाज अदा झाल्यानंतर या इज्तेमाचा समारोप झाला तेव्हा हळूहळू यातील सहभागी नागरीक शिस्तबध्द पध्दतीने पेडगावच्या बाहेर पडत होते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत पेडगाव ते कोल्हा, पेडगाव ते परभणी या महामार्गावर वाहनांच्या रांगा व नागरीकांची तूफान गर्दी उसळली होती.                                  

परभणीच्या विसावा चौकसुध्दा रात्री उशीरापर्यंत गर्दीने फुललेला होता. दरम्यान, या सोहळ्या दरम्यान शहर वाहतूक पोलिस यंत्रणेसह ग्रामीण पोलिस व जिल्हा पोलिस यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या