💥श्री.खंडोबारायाची महाराष्ट्रातील व कर्नाटकमधील देवस्थाने व श्री खंडोबारायाची संपूर्ण माहिती....!


💥मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते💥

✍️ मोहन चौकेकर

खंडोबाचे नवरात्र

नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I

 म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II

 मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I 

मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II 

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

 मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. 

खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्वाचा आहे. 

भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. 

तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.

खंडोबाची पांच प्रतिके:

१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. 

२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. 

३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. 

४) मूर्ति: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 

५) टांक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.

खंडोबा हि देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. 

काही सौम्य नवस:

१) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे.

२) दीपमाळा बांधणे. 

३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. 

४) पायऱ्या बांधणे. ओवरी बांधणे. 

५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. 

६) पाण्याच्या कावडी घालणे. 

७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. 

८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) 

९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. 

१०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. 

११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

दिन विशेष:

 रविवार हा खंडोबाचा मानण्यांत आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:

महाराष्ट्र: 

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 

2) निमगाव 

३) पाली-पेंबर सातारा 

४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) 

५) शेंगुड (अहमदनगर) 

६) सातारे (औरंगाबाद)

७) माळेगाव 

कर्नाटक: 

१) मैलारपूर-पेंबर (बिदर) 

२) मंगसूल्ली (बेळगाव) 

३) मैलारलिंग (धारवाड) 

४) देवरगुडू (धारवाड) 

५) मण्मैलार (बल्ळारी).


खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात.

खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार,

तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात.

स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा

वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.

हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा

असे म्हणू लागले.

खंडोबाची वेशभुषा:

साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर,

डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो.

प्रमुख भक्ती: बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय.

हळदपूड, सुक्या खोबर्याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व

" येळकोट येळकोट जय मल्हार " हा गजर करतात.

याचा अर्थ असा लावतात, की ' हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.

खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.

मानप्रमाणे : प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो.

देवस्थाने :

महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत.

मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी अकरा स्थाने आहेत.

१) जेजुरी (पुणे) 

२) शेबुड (अहमदनगर) 

३) निमगाव दावडी (पुणे)

४) सातारे (औरंगाबाद) 

५) पाली-पेंबर (सातारा) 

६) मंगसुळी (बेळगांव) 

७) मैलारलिंग (धारवाड) 

८) मैलार देवगुड्ड (धारवाड)

९) मण्णमैलार (बल्लारी ) 

१०) मैलापुर-पेंबर (बिदर) 

११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद).

१) जेजुरी

हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्या ६३ ओवऱ्या आहेत.

२) नळदुर्ग:

नळदुर्ग हे गांव सोलापूरच्या ईशान्येस साधारण ३० मैलावर आहे. असे सांगतात की या ठिकाणी खंडोबाची तीन स्थाने आहेत. शके १५३६ मध्ये एक स्थान किल्ल्यांत होते. असे कागदपत्रांत आहे.

नळदुर्ग गावाच्या उत्तरेस दोनएक मैलांवर दोन स्थाने जवळ जवळच आहेत. अहिल्याबाईने बांधलेले देवालय आज प्रसिद्ध आहे. सुमारे तीन मैलांवर अणदूर गांवी खंडोबा वसतीस असतो असे भक्त मानतात.

३) पाली:

पाली हे गाव सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सातार्यापासून १५ मैलावर आहे. सातारा तालुक्यांतील अतीत या गावाजवळ ते ५ मैलावर कर्हाड तालुक्यांत आहे. या मंदिर ओवरींत एक शिलालेख आहे. हे देवस्थान शके १६९४ मध्ये चैत्र वद्य १३, गुरुवार या दिवशी श्री. गणेश खंडो व श्री महिपत खंडो पारगावकर यांनी बांधले.

४) मंगसुळी:

मंगसुळीचे हे देवस्थान बेळगांव जिल्ह्यांत अथणी तालुक्यांत आहे. येथे अश्विन महिन्यांत मोठी यात्रा भरते आणि अश्र्विन शुद्ध द्वादशीस भंडारा होतो. या ठिकाणी वाघ्या साखळदंड तोडतो. व त्यावरुन भविष्यही वर्तविले जाते.

५) सातारे:

हे गांव औरंगाबाद स्टेशनपासून २ मैलांवर आहे. येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते.

६) मैलारलिंग:

हे स्थान धारवाडपासून सुमारे २ मैलावर आहे. उंच टेकडीवरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.

७) देवरगुड्ड:

पुणे-बंगलोर मार्गावर पुण्यापासून साधारणपणे ४०० मैलावर देवरगड्ड हे स्टेशन आहे. तेथून डोंगरावरील हे देवस्थान ४ मैलावर आहे. हे देवस्थान चुन्या-मातीचे आहे. मंदिराची शिखरे खुजी वाटतात. या देवस्थानास शके १६३८ ते १७६७ पर्यंत अनेक देणग्या मिळाल्याचे शिलालेख व कागदपत्रे आहेत.

खंडोबा अवतार चरित्रातील प्रमुख खंडोबा क्षेत्र

श्री क्षेत्र जेजुरी

जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला

म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले.

या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते.

श्री क्षेत्र पाली

खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध झाले, सातारा जिल्ह्यात तारळी नदी काठी वसलेला निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह येथे संपन्न होतो, मुळात या गावचे नाव राजापुर येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती तिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा येथे लिंगरूपाने प्रगट झाले तिच्या नावावरूनच या गावास पाल अथवा पाली हे नाव प्राप्त झाले

श्री क्षेत्र नळदुर्ग / अणदूर

नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथेच संपन्न झाला, येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले, उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर नळदुर्ग आहे, नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो, मंदिरांची झालेली स्थलांतरे, यात्रांचे बदलेल्या जागा व अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.

श्री क्षेत्र मृणमैलार

खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो. हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नाव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी लोक श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात. हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य युद्ध भुमि आहे व याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात. मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंतल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे.

श्री क्षेत्र देवरगुड्डा

देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा झाले. खंडोबाने ज्या मणि मल्ल राक्षसांचा वध केला त्या राक्षसांचे राजधानीचे हे गाव त्यांचे मृत्यू समयीचे विनंती वरून देवाने त्यांचे प्रेतासन करून येथे वास केला अशी जनश्रुती आहे. टेकडीवर वसलेले हे गाव सुंदर आहे देवरगुड्डा कर्नाटक राज्यात असुन राष्ट्रीय महामार्ग ९ वर धारवाड कडून बंगलोर कडे जाताना मोतीबेनुर गावाचे पुढे ९ किमी अंतरावर रस्त्याचे पुर्व बाजुस देवरगुड्डा कडे जाण्यासाठी कमान दिसते येथून ८ किमी अंतरावर देवरगुड्डा आहे राणीबेनुर - गुंतल रस्त्यावर देवरगुड्डा असल्याने या मार्गावरून ही येथे पोहचता येते.

श्री क्षेत्र आदिमैलार

आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ' मल्हारी महात्म्य ' याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे


खंडोबाची उपासना:

खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.

खंडोबाची पूजा:

खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.

कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत. पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री :

पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा.

देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.

सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

महानैवेद्य:

सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य , वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.

खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात.

कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात.

वारी मागणे

काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण, वाघ्या-मुरळीस बोलावतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.

वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.

दान-धर्म:

या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.

दिवटी-बुधले:

दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी.

व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे.

लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत.


खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी ?

॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.

साहित्य:

कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशीच जमवुन ठेवावे.

प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती; अथवा भंडार पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात..

१)  षड्रात्र उत्सवात देव खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.

२) मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की,

दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।

अर्थ - तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.

३) अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.

४) अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.

सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात. मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा. तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.

या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे.


जेजुरीगड श्रीखंडोबा मंदिर

मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच

जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊ या.

जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी-मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत.  या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात.

जेजुरगडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे.

पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते.त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या उजव्या हाताला संगमरवरी यक्षाची मूर्ती दिसते तर डावीकडील बाजूस दगडात कोरलेला गणपती आहे.मुख्य गर्भागृहाम्ध्ये प्रवेश करताना समोर दिसतो तो मेघडंबरीतील भव्य मोठा देव्हारा. समोर खालील बाजूस श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभूलीग दिसते, श्रीखंडोबा स्वयंभूलिंग हे म्हाळसा स्वयंभू लिंगापेक्षा आकाराने मोठे आहे,

त्याला लागुनच पाठीमागील बाजूस बाणाईचे लिंग आहे, त्याच्या बाजूला गणेश मूर्ती, पितळी कुत्रा व श्रीखंडोबा म्हाळसा उत्सव मूर्तीचे दोन जोड आहेत. त्याच्या पाठीमागील कट्ट्यावर श्रीखंडोबा म्हाळसाचे तीन मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी दोन मोठे मूर्तीजोड प्रभावळीसह आहेत. डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी पेशव्यांना वारस मिळावा म्हणून केलेल्या नवसपूर्तीप्रित्यर्थ अर्पण केलेला आहे तर त्याच्या शेजारील छोटा मूर्तीजोड सातारकर भोसले छत्रपतींनी अर्पण केलेला आहे. उजवीकडील मूर्ती जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील शरीफजीराजेंनी अर्पण केला आहे. या मूर्तींच्या पाठीमागे भिंतीतील मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे, यांच्या आसनाखाली मणीसूर व मल्लासुर दैत्यांच्या शिरासोबत घोडा आहे. श्री मार्तंड भैरवाचे दोन्ही बाजूस देवींच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात उत्तर व दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोली आहेत पैकी दक्षिणेकडील खोलीत देवाचे शेजघर असून त्यामध्ये देवाचा चौपाळा आहे. उत्तरेकडील खोलीमध्ये तळघर असून तेथे श्री खंडोबा बाणाई स्वयंभू लिंगाचे गुप्तमल्लेश्वर स्थान आहे ते फक्त महाशिवरात्रीस खुले असते.

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर त्रेसष्ठ ओव-या आहेत पैकी काही ओव-यांचे अलीकडील काळात बांधकाम करून खोलीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या पाठीमागील भिंतीमध्ये कोनाड्यात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गावर तुळजाभवानी, पंचलिंग, भुलेश्वर, अन्नपूर्णा व साक्षीविनायक मंदिरे आहेत, तसेच गणेश मूर्ती,उमाजी नाईक तालीम, घृतमारी शिळा, मल्हार पद, मारुती आणि बारद्वारीतील देवघर व देवाची पालखी पहावयास मिळते. पंचलिंग मंदिराला लागुनच देवाचे भंडारगृह आहे, याठिकाणी देवाच्या उत्सवमूर्ती दसरा व सोमवती अमावास्येला बसविल्या जातात.

टांक

सर्वसाधारणतः टांक हे चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे असतात,परंतु क्वचित प्रसंगी जुने पाषाणातील टाक सुद्धा आढळतात. देवघरात पूजेमध्ये असणा-या टांकांची संख्या विषम असते. तांब्यावर चांदीचा पातळ तुकडा ठेवून बनविलेले टांक विशेष प्रचलित आहेत. चांदीच्या तुकड्यावर साच्याच्या सहाय्याने देवतेच्या मूर्तीचा ठसा उमटविला जातो आणि मग हा चांदीचा तुकडा तांब्याच्या तुकड्यावर बसविला जातो आणि सर्व बाजूने तो तांब्याच्या तुकड्यात सांधला जातो. त्यामुळे त्याला भक्कमपणा येतो.

टांकांवरील बारीकसारिक तपशील हे तर या कलेचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. देवाचा आपल्यावरील अनुग्रह व्हावा, या भावनेतूनही भाविक टांक तयार करवून आपल्या देव्हार्यात ठेवतात. जेजुरीच्या खंडोबाचे टांक दोन-तीन प्रकारचे मिळतात. खंडोबा हा घोड्यावर असून त्याच्या मागे त्याची पत्नी म्हाळसा बसली आहे आणि खंडोबाच्या हातात शस्त्रे असून घोड्याच्या खालच्या बाजूला एक श्वान आहे. खंडोबा या दैवताची पारंपरिक कथा या टांकात चित्रित झाली आहे.

घरामध्ये शुभकार्य उदा. लग्न,मौजीबंधन ई. प्रसंगी नविन टांक बनविले जातात, अथवा उजळले जातात. टांक बनवून घेताना माहितगार कारागिरांकडून बनवून घेणे उत्तम. ब-याचदा अमराठी अथवा अकुशल कारागीर टांक बनवून देतात परंतु आपल्याकडील उपलब्ध असणारे टांक भाविकांच्या माथी मारतात. अशा वेळी जेजुरी, तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी टांक बनवून घेऊन विधिवत पूजा करून घेणे सोयीस्कर पडते.

मूर्ती

मूर्ती :श्रीमल्हारी म्हाळसाकांत हे वीर योद्ध्यांचे दैवत असल्याने सदैव युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्ये दिसते. त्याबरोबरच सोबत पत्नी म्हाळसा देवी असल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि सुबत्ता देणारे दैवत म्हणूनही बहुजन याला देवघरामध्ये पूजतात. मल्हारभक्तांच्या देवघरामध्ये पितळ, चांदी किंवा पंचधातू पैकी एका धातूमध्ये घडविलेली, उभ्या किंवा अश्वारूढ स्वरूपामध्ये श्रीखंडेरायाची मूर्ती आढळते. उभ्या असलेल्या मूर्तीमध्ये वामांगी म्हाळसा सहित श्रीखंडोबा असतात, तर पाठीमागे प्रभावळ असते.  अश्वारूढश्रीखंडोबाच्या मूर्ती द्विभुज किंवा चतुर्भुज असतात, द्विभुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग आणि पानपात्र आढळते तर चतुर्भुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग,त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र असते. बहुतांश वेळा घोड्यावर बसलेल्या श्रीखंडेराया सोबत म्हाळसादेवीही असते आणि घोड्याच्या पायाजवळ श्वान आढळतो. अलीकडे घडविलेल्या मूर्तींमध्ये श्रीखंडोबाच्या शिरावर शिंदेशाही पगडी असते, जुन्या मूर्तींचे शिरस्त्राण हे टोपासारखे असते.

अश्व

मणि युद्धास प्रवर्तला, जाऊनि अश्वावर बैसला

ते पाहुनी शंकर भोळा, चंद्रालागी आज्ञा करी

म्हणे तु अश्व होई सत्वर, आज्ञा वंदुनी निशाकर

अश्व झाला साळंकार परम चपळ असे तो

त्या अश्वावर करी आरोहण

दैत्य मस्तक टाकीला छेदुन

त्या दिवसापासून अश्व वाहन प्रिय असे देवासी

मणि मल्लासूर युद्धामध्ये मार्तंड भैरवाने नंदी ऐवजी अश्व वाहन स्वीकारले पण तो अश्व चपळ असावा म्हणून चंद्राला अश्वरूप घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे चंद्राने अश्वरूप धारण केले. या अश्वाने खंडोबा परीवारमध्ये महत्वाचे स्थान मिळवले आहे त्यामुळे मल्हारभक्तांच्या देवघरा मध्येही याला स्थान मिळाले आहे. आजही जेजुरगड मंदिरामध्ये मध्य गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला स्वार नसलेल्या अश्वाची प्रतिकृती दिसते ती चंद्राचीच असल्याचे मार्तंड भैरव ग्रंथा मध्ये उल्लेखले आहे.

घोड्याचा संबंध शक्तीशी जोडला जात असल्याने घरातील आजार किंवा संकट नाहीसे होण्यासाठी देवाला घोड्याची प्रतिमा अर्पण केल्यास सर्व अरिष्ट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्वान

पाताळामध्ये बळीराजाच्या महालामध्ये श्रीविष्णूनी दिलेल्या वचनाला जागून द्वारपाल म्हणून काम करीत असताना सामवेदाने त्यांची कुत्सितपणे चेष्टा केली असता श्रीविष्णूनी त्याला श्वान होऊन भुंकत राहण्याचा शाप दिला व मार्तंड भैरव अवतारामध्ये उद्धार होईल असा उशाप दिला, अशी कथा मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. तर बाळकृष्णाने देव्हा-यातील खंडोबा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी खाल्ल्याने देवाने आपली माया दाखवीत त्याचे कुत्र्यामध्ये रुपांतर केल्याची लोककथा प्रसिद्ध आहे.खंडोबा उपसकांमध्ये घोड्याबरोबरच श्वानसुद्धा वाहन असल्याची भावना आहे त्यामुळे खंडोबाच्या मूर्तीबरोबर त्याला स्थान असते. घोडा किंवा कुत्रा स्वप्नामध्ये आल्यास मल्हारी मार्तंडाचा दृष्टांत झाला असे भाविक मानतात.

गाठा किंवा गोफ

इंद्र गोष्ठ कंठी बांधोन, वारी मागे शिवा लागून l

म्हणे मणी मल्ल शत्रू निर्दाळून, सनाथ करी दयाळा l

मणी मल्ल दैत्यांकडून पिडीत झालेल्या ऋषीमुनींसोबत स्वर्गलोकीचे देव कैलासावर पोहोचले त्यावेळी इंद्र देवाने आपल्या गळ्यामध्ये गाठा अडकविल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे.

श्रीखंडोबाचे उपासक असलेल्या काही कुळांची घरवाघ्या सोडण्याची प्रथा असते अशा बहुतांश श्रीखंडोबा भक्तांच्या गळ्यामध्ये चांदीचा गोफ दिसतो त्याला गाठा किंवा गोष्ठ असे म्हणतात. दुहेरी पट्टीपासून बनविलेला गाठा हा चांदीचा किंवा पंचधातूचा असतो, एका बाजूला गोलाकार कळस असतो तर दुस-या बाजूला कळस अडकविण्यासाठी पट्टीचा फासा असतो. देवघरामध्ये याची पूजा होत असते तर कुळधर्म कुलाचाराचे वेळी हा गळ्यामध्ये परिधान केला जातो.

शिक्का

सोने अथवा चांदी पासून बनविलेल्या पत्र्यावर कवड्यांची नक्षी उमटविलेली असते, आणि त्याच्या दोन्ही बाजूची टोके कडीच्या माध्यमातून गोलाकार पद्धतीने

एकमेकांमध्ये अडकविलेली असतात त्याला 'शिक्का' किंवा 'कडे' असे म्हणतात. ज्या मल्हारभक्तांना गाठा देवघरामध्ये ठेवणे शक्य होत नाही त्यांनी 'गाठा' चीच छोटी प्रतिकृती म्हणून शिक्का देवघरामध्ये पुजावा अशी जाणकार मंडळी सांगतात. नाशिक अहमदनगर धुळे आदी जिल्ह्यामधील भक्तांच्या देवघरामध्ये शिक्का आवर्जून पहावयास मिळतो.

दिवटी बुधली

दिवटी ही दिव्यत्व ज्ञानाचे, तर बुधली ही बोधाचे प्रतिक आहे. दिवटी बुधली धातू किंवा लाकडापासून बनविली जाते. श्रीमल्हारी मार्तंडाच्या पूजादैवातांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे, 'मार्तंड विजय' ग्रंथामध्ये दिवटी आणि बुधलीचे महत्व अधोरेखित केले आहे ते खालील प्रमाणे

मल्ल वधिला जे दिवशी, तेव्हा आनंद झाला सुरवरांसी

सिंहासनी बैसवूनी शिवासी दीपिका घेउनी तिष्ठती

त्या दिवसापासून दीपिका प्रज्वलीती भक्तजन

तैलार्थ बुधली धारण दक्षिण करी करावी

मल्लासूर दैत्याचा संहार केल्यानंतर सर्व देवगणांनी दिपिकेने अर्थात दिवटीने ओवाळिले म्हणून आजही मल्हारभक्तांमध्ये दिवटी बुधली देवघरामध्ये पुजली जाते .खंडेरायाच्या कुळधर्म कुलाचारातील जागरण गोंधळ अथवा तळीभंडार करताना दिवटी अवश्य पेटवावी असा संकेत आहे.

संत एकनाथ महाराज म्हणजे समाजसुधारकांमधील अग्रणी, आपल्या लिखाणातून भक्ती मार्गातील काटे वेचून बाजूला टाकून फुलांना आकर्षक पद्धतीने सजविण्याची कला त्यांच्याकडे होती. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर शब्दातून कोरडे ओढत असतानाच भक्ती मार्गातील एखाद्या सत्कृत्याचे उन्नतीकरण करत प्रबोधनाचे मोठे महत्कार्य त्यांनी केले. संत एकनाथ महाराजांनी श्रीमल्हारी मार्तंडाची भक्ती करीत असताना दिवटी बुधलीचे सुंदर रूपक सादर केले आहे. मुरुळीकडे विषय वासनेच्या नजरेने पाहणा-या समाजावर जोरदार प्रहार करीत असतानाच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडणा-या दिवटीमध्ये तेलरुपी बोध देणा-या बुधलीचा पुरस्कार केला आहे.

इच्छामुरुळीस पाहूं नका पडाल नरकद्वारी ।

बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी ।।

कोटंबा

पात्र पूर्णैः म्हणजे,पूर्णपात्र कोटंबा प्राकृत बोलती सर्वत्र

कुलधर्म कुलाचाराचे वेळी कोटंबा पूजन करून अन्नदान केले जाते. मणी मल्ल दैत्यांसोबत युद्ध करून विजय मिळविल्या नंतर सप्त ऋषींनी श्री मार्तंड भैरवास आपल्या आश्रमा मध्ये पूजन करून तोषविले व पात्रामध्ये अन्न वाढीले त्याच पूर्णपत्राने सर्व देवसेनेस अन्न पुरविले. अशी कथा पूर्णपात्राविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये तेहतिसाव्या अध्यायामध्ये दीली आहे,

पात्रे भरून विपुल अन्न, देती याचकांलागून

पूर्णपात्र असे अभिधान, ऋषी ठेविती ते समयी

ती जगी प्रसिद्ध जाली कुलधर्म करुनी पूजिती चंद्रमौळी

ते दिवशी याचक वाघे मुरुळी यांची पात्रे अन्ने करून भरिजे

कोटंबा चौकोनी व लाकडी, धातूचा किंवा पाषाणाचाही असतो. कुलधर्म कुलाचाराचे वेळी वाघ्या कडून कोटंबाचे पूजन केले जाते.

भंडारी

वाघ्याच्या गळ्यामध्ये श्रीखंडेरायाचा प्रिय असा भंडार ठेवण्याची चौकोनी पिशवी असते त्यालाच भंडारी असे म्हणतात. भंडारी व्याघ्रचर्म किंवा अन्य कातड्यापासून बनविलेली असावी असा संकेत आहे परंतु काही वेळा ती कापडीही आढळते. जागरणाचे वेळी वाघ्या उपस्थित असलेल्या प्रत्येकाला यातील भंडारा कपाळी लावतो.

गळयामध्ये घालूनिया भंडारी

उभा असे सदगुरुनाथांचे द्वारी

कर जोडूनी मागतो वारी

घोळ किंवा घोळक

कैलासीहून मदनदहन,

निघे मणीमल्ल वधा लागून,

तेव्हा घोळक वाद्य लोहाचे निर्मून,

हाती घेऊन वाजवीत असे,

ते वाद्य प्रिय मार्तंडासी,

ते कृपेने दिधले वाघ्यांसी

श्रीशंकर कैलासाहून मणी मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी लोहाचे घोळक वाद्य निर्माण केल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. 'घोळ' दिसायला तलवारीच्या मुठीसारखे असते, त्याच्या अर्धगोलाकार तारेमध्ये छोट्या छोट्या चकत्या किंवा कड्या अडकविलेल्या असतात, त्या एकमेकावर आदळल्याने नाद निर्माण होतो. वाघ्याकडे हे वाद्य आढळते.चंगडीमडी अथवा खंजिरी वाजविताना वाघ्याच्या अंगठ्या मध्ये लोखंडी कडी अडकविलेली असते त्याला चंग म्हणतात.

मार्तंड भैरव अवतार कथा

कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

इंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव

सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.

या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.

दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.

त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद खंडोबा !

श्रीखंडेरायाचा षड् रात्रोत्सरंभ देव दीपावली , चंपाषष्ठी उत्सव !

असे जेजुरी राजधानी जयाची | सती म्हाळसा पट्टराणीच साची || असा थोर मार्तण्डराणा मल्हारी | सदा वंदितों देव तो खड्गधारी || १ ||

|| सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट ||

नमोचंड मार्तण्ड ता खड्गधारी || १ ||

उभा जेजुरीला असे सौख्यकारी || २ ||

करीं शूल शोभे तुज़ी थोर सत्ता || ३ ||

नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ४ ||

अगा म्हाळसेच्या वरा देवराया || ५ ||

असावी शिरीं ती कृपाछत्र छाया || ६ ||

तुझ्यावीण आतां नसे कोण त्राता || ७ ||

नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ८ ||

ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसाभूषितांङ्कम् l

श्वेताश्वम् खडःगहस्तं विबुधबुध गणै सैव मानं कृतार्थे l

युक्तांघ्रि दैत्यमूघ्नी डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम् l

नित्यंभक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृत्तं नित्यमोंकाररूपम् ll

विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूपधरायच |

शरणं भवभुतेषु करूणाकर शंकर ||

मृत्युंजयाय रुद्राय निलकंठाय शंभवे |

अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ||

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |

उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

मल्लारिं जगातान्नाथं त्रिपूरारिं जगद्गुरुं 

मणिघ्नं म्हालसाकांतं वंदेहं कुलदैवतम्

आदिरुद्र महादेव मल्लारिं परमेश्वरम् 

विश्वरुप विरुपाक्षं वन्देहं भक्तवत्सलम्

प्रियाणानंद गंगामहालसाभ्यां सहिताय 

श्री मार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः |

स्कन्दनाभि समुद्रभूते | श्रीमैरालप्रियंकरि | 

गौरीप्रिय ताडिदगौरी | लक्ष्मीसुते नमोस्तुते |

ॐ अश्वरुढाय विद्महे | म्हालासाकांताय धीमही |

तन्नो मल्हारी प्रचोदयात् ||

ॐ शिवशक्ति विद्महे | मार्तण्डभैरवाय धीमही |

तन्नो मल्हारी प्रचोदयात् ||

|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||

सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट

येळकोट येळकोट जय मल्हार.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या