💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे क्षय रुग्णांना दत्तक घेऊन पूरक पोषण आहाराचे वाटप...!


💥व्यंकटराव पाटील सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन परभणी चा उपक्रम💥


ताडकळस प्रतिनिधी

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळस अंतर्गत क्षय रुग्णांना दत्तक घेऊन पूरक पोषण आहाराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. कल्याण कदम यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना आळने, सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शालिनी कदम, क्षयरोग विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्व्यक विठ्ठल रणबावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

माननीय राष्ट्रपती महोदयांनी 09 सप्टेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत उपचाराखाली असलेल्या क्षय रुग्णांना पूरक पोषण आहार मिळावा यासाठी निक्षय मित्र मोहिमेस जिल्ह्यामध्ये प्रारंभ झाला आहे. निक्षय मित्र म्हणून तयार असलेल्या संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून उपचारा खालील क्षय रुग्णांना पूरक पोषण आहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत परभणी येथील व्यंकटराव पाटील सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने प्रा.आ. केंद्र ताडकळस अंतर्गत सर्व क्षय रुग्णांना दत्तक घेऊन पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. व पुढील सहा महिन्यापर्यंत संस्थेच्या वतीने पूरक पोषण आहार देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, उपचाराखाली असलेल्या क्षय रुग्णांना औषधी सोबतच पूरक पोषण आहाराची आवश्यकता असते सकस आहार असेल तर निश्चितपणे क्षयरुग्ण बरा होण्यास मदत होते. सामाजिक बांधिलकी जपत समाजतील दानशूर व्यक्ती/संस्थानी पुढे येऊन निक्षय मित्र बनावे व क्षय रुग्णांना दत्तक घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

ताडकळस व परिसरामध्ये 12 वर्षे आपण रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा केलेली आहे. या भागातील नागरिकांशी आपले ऋणानुबंध आहेत. या अभियानाच्या माध्यमातून छोटीशी सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याची भावना यावेळी व्यंकटराव पाटील सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शालिनी कदम यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल रणबावरे यांनी तर सूत्रसंचालन तालुका समूह संघटक माधव आवरगंड यांनी केले. उपस्थितांचे आभार वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक संतोष कठाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना आळने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक जगदीश नवले, आरोग्य सहायिका प्रेमाताई गमे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भिमराव काशीदे, वर्षा काळे, आरोग्य सेविका माधुरी खोत, संगीता राठोड, एस.एस. चौरंगे, आशा स्वयंसेविका जयश्री घोन्सीकर, रूपाली गवते, सोशल फाउंडेशनचे सदस्य संजय खंडागळे, सोनू खंडागळे यांनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या