💥महागाईच्या भडक्यात होरपळणार्‍या सर्वसामान्यांना मोठा झटका; घरगुती वापराचे बिल तब्बल २०० रुपयांनी महागणार....!


💥राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार💥 

✍️ मोहन चौकेकर

मुंबई - आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरनंतर आता घरगुती वापराची वीज सुद्धा महागणार आहे. राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.


कोळसाटंचाई, त्यामुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे ‘महावितरण’चा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या दरात  वाढ होण्याची शक्यता आहे.

याआधीच राज्य सरकारने राज्यात विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. दरम्यान, वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. मात्र, तो निधी २०२१ मध्येच संपला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

दरम्यान, उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त २० टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. त्यासाठी २० हजार कोटींचा खर्च आला. तसेच क्रॉस सबसिडीतील पैसादेखील कोरोना काळात मिळाले नाही. त्यामुळे आणखी २० हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान ४० हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.                  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या