💥शासकीय रुग्नालयांतील आरोग्य अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबून रुग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात - जिल्हाधिकारी💥परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल गंगाखेड,पालम,पूर्णा येथील रुग्णालयांचा घेतला आढावा💥


परभणी (दि.23 नोव्हेंबर) :  आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांवर नाममात्र शुल्कात उपचार करणारे अशी उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची ओळख असून, त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वेळेत वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज येथे दिले. तसेच मुख्यालयात न थांबणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियमित मुख्यालयात राहूनच आपली सेवा करावी. अन्यथा संबंधीतावर योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय, पालम आणि पूर्णा ग्रामीण रुग्णालयाची त्यांनी आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी पाहणी केली. 


उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, गंगाखेडचे तहसीलदार श्री. येरमे, पालमच्या प्रतिभा गोरे, पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, गंगाखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे, पालमचे डॉ. दिनेश बडे, पुर्णाचे डॉ. गाडेकर यावेळी उपस्थित होते. 

उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य सामुग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कोविडअंतर्गंत जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेले साहित्य, वैद्यकीय संसाधने व यंत्रसामुग्री, आरोग्य सुविधा व मनुष्यबळ याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन केली.  


गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची सर्व पदे भरली आहेत. त्यामुळे येथे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन थिएटर आणि ऑपथॉरमिक ऑपरेशन थिएटर,  कँथेरँक्ट्रचे ऑपरेशन करता येईल. छोट्या आणि सहजसुलभ शस्त्रक्रिया येथील रुग्णालयात करता यायला हव्यात.  येथील शस्त्रक्रिया विभागाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. 

येथील वैद्यकीय सुविधा चांगल्या देण्यात येत असल्या तरी त्या सोयीसुविधा अधिक चांगल्या पुरवण्याचे काम करावे लागणार आहे. सध्या प्रत्येक तालुक्यातून डायलिसीस युनीट सुरू करण्याची मागणी येत असून, गंगाखेड येथे लवकरच डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालय परिसरातील दर्शनी भागात आरोग्य सुविधांबाबतचे दैनंदिन वेळापत्रक लावण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच यावेळी रुग्णालय परिसरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधून येथील आरोग्य सेवेसंबधी असलेल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय साहित्याची पाहणी करून सदर साहित्य वापरात आणण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच  रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत  कोणतेही तक्रार समस्या असल्यास रुग्ण, त्यांचे नातेवाईक, नागरिकांनी किंवा पत्रकार बांधवांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास माहिती कळवावी असे आवाहन त्यांनी केले.

पीएसए प्लाँट, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी, टेलीमेडिसिन, सामान्य कक्ष, प्रसूती पूर्व चिकित्सा कक्ष, नवजात कक्ष, प्रसूती गृह, प्रयोगशाळा, रक्तसाठा सेंटर, दंतरोग- नेत्र चिकित्सा कक्ष, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागाचे काम लवकरात-लवकर करून शस्त्रक्रिया सुरू कराव्यात. डायलिसीस, वैद्यकीय क्षेत्रातील ऑक्सिजन निर्मिती प्लाँट कार्यान्वित करण्यासाठीचे प्रशिक्षण देऊन या सेवा सुरू ठेवण्याचे आदेशही श्रीमती गोयल यांनी दिले. 

पालम येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचा-यांनी मुख्यालयी राहून आपली सेवा करावी. अन्यथा संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच रात्रीच्याही ड्युटी प्रामाणिकपणे कराव्यात. तसेच याठिकाणी प्रसूती तज्ज्ञ पद भरलेले असूनही प्रसूतीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने आणि समन्वयाने प्रामाणिक काम करून प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात न पाठवता त्या येथेच कराव्यात. यावेळी रुग्णालय परीसरात नव्याने बांधण्यात आलेल्या अपघात विभागाच्या नवीन इमारतीचे लवकर हस्तांतरण करून घेण्याचे आदेशही त्यांनी संबंधीतांना दिले . 

पुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती तज्ज्ञ असूनही या‍ठिकाणी प्रसुती न करता त्याना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविलेले जात आहे. पुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालय येथे प्रसूतीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांचे ऑडिट करण्याचे आदेश श्रीमती गोयल यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा रुग्णालयाकडे प्रसूतीसाठी महिलांना न पाठवता; ग्रामीण रुग्णालयातच त्यांची प्रसूती करावी, असे आदेशही त्यांनी दिले. येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना श्रीमती गोयल यांनी अधिकारी -कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. रुग्णांवर उपचार करतांना वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी मानवी दृष्टिकोणातून काम करावे असे सांगून अधिकारी-कर्मचा-यांनी आपली  मानसिकता बदलण्याबाबत त्यांनी सुनावले. रुग्णवाहिका चालकांअभावी जिल्ह्यातील बहूतांश रुग्णवाहिका सेवा बंद असल्याचा जिल्ह्यात प्रश्न असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून वाहनचालकाची नियुक्त करत सेवा सुरु करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या असल्याचे सांगितले.   

यावेळी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय, पालम आणि पूर्णा ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती......

सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या