💥परभणीकर रसिकांचा स्वरमयी दिवाळी पहाट' ला उदंड प्रतिसाद....!


💥सुरेल स्वरांनी सजली परभणीकरांची पहाट💥

परभणी (दि.25 आक्टोंबर) - महापालिका आणि अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा स्वरमयी दिवाळी पहाट या महात्वाकांक्षी कार्यक्रमाची मुहूर्तमेढ झाली प्रशासनाकडून, प्रथमच मोठ्या दिमाखात पार पडलेल्या ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याला परभणीकरांनी सुध्दा तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद दिला. रसिक प्रेक्षक कौटुंबिक लग्न समारंभात तयार होऊन शामील व्हावे, तसे या कार्यक्रमासाठी सकाळी ६ पासून येत होते. सकाळी ठिक ६ः४० वाजता सुरू झालेली ही मैफिल चढत्याक्रमाने जात सलग अडीच तास रंगली. महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्थानिक कलावंत ज्यांनी परभणीचा लौकिक सर्वत्र वाढवला त्या सर्वांना सुध्दा यानिमित्ताने परभणीकरांना ऐकता यावे असा विचार व्यक्त केला होता. त्याला अनुसरून कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासह, यज्ञेश्वर लिंबेकर, अनिकेत सराफ, नम्रता पाटील, प्रांजल बोधक, राजू काजे, शुभम म्हस्के या कलावंतांना सुध्दा निमंत्रित केले होते.


सुरूवात महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांनी आपल्या पहाडी कसदार गायकीत राम कृष्ण हरि नामघोषाने केली.त्यानंतर पाहुणे कलाकार ज्ञानेश्वर मेश्राम यांनी, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला हा लोकप्रिय सांप्रदायिक अभंग सादर केला. मेश्राम यांनी एकाहून एक सरस अभंग व गीते गायली. त्यांनी गायलेली, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी स्वरबध्द केलेली राधे चाल चाल बाई चाल ही गवळण रसिकांना विशेष भावली.माऊलींनी आणि नम्रता अरूण पाटील यांनी गायलेल्या गोमू संगतीनं गाण्यावर रसिकांनी ठेका धरला.

या गीतानंतर नम्रता पाटील यांनी रूपेरी वाळूत हे गीत गाऊन वातावरणात वेगळा रंग भरला.अनिकेत सराफ यांनी निघालो घेउन दत्ताची पालखी, देव देव्हाऱ्यात नाही या भक्तिगीतांतून त्यांच्या तरल गायकीने भक्तिरंग भरला. शुभम म्हस्के याने परभणीचाच भूमिपुत्र, ज्याने परभणी गौरव गीताचे सुध्दा संगीत दिले आहे असा रोहित नागभिडे याचे ख्वाडा चित्रपटातील तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय हे अत्यंत लोकप्रिय गीत अतिशय बहारदार शैलीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रांजल बोधकच्या 'लख्ख पडला प्रकाश' या अजय अतुल द्वारा संगीतबध्द गीताने तर वातावरणात कमालीचे चैतन्य निर्माण झाले. प्रांजलच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध होऊन तिला हा गोंधळ पुन्हा गाण्याची रसिकांनी एकमुखाने विनंती केली. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या लोकप्रिय झेंडा गीताने मैफिलींची सांगता झाली. अनिकेत सराफ यांनी अत्यंत खुमासदार पध्दतीने या मैफिलीचे सुत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर मेश्राम यांचे काही गमतीशीर किस्से आणि त्यांचा जीवन प्रवास यावेळी त्यांनी परभणीकरांना सांगितला. येथील चित्रकार सिध्दार्थ नागठाणकर यांनी, या कार्यक्रमा दरम्यान गाण्यांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमा सोबतच अतिशय सुंदर पेंटींग काढून कार्यक्रमाच्या समारोपाला ते पूर्ण करून लगेचच पाहुणे कलावंत ज्ञानेश्वर मेश्राम यांना भेट दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व परभणी मनपा कर्मचाऱ्यांना मैफिल जसजशी रंगत चालली होती तसतसा आनंद आणि समाधान वाटत होते. आमदार सुरेश वरपुडकर, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त गग्गड यांनी सर्व कलावंतांचा सत्कार केला. यावेळी सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, शहर अभियंता वाशिम पठाण, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, नगरसचिव विकास रत्नपारखी, उद्यान विभाग प्रमुख मो अथर, युवराज साबळे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. वाढत्या उन्हात बसून सुध्दा, मैफिल संपवूच नये असा झालेला परभणीकर रसिकांचा आग्रह पाहुण्या कलाकारांना थक्क करून गेला. परभणीकरांच्या रसिकतेला आणि परभणीतील एकाहून एक सरस कलावंतांना त्यांनी मानाचा मुजरा केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, उद्यान विभागाचे सुधीर टेहरा, युवराज साबळे, उद्यान परवेक्षक मो. अथर, राहुल धुतडे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा शेख शादाब यांनी परिश्रम घेतले. आभार सुभाष मस्के, अभिजीत कुलकर्णी यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या