💥महात्मा गांधींचे विचार आजही प्रासंगिक आहेत - डॉ. नमिता निंबाळकर


💥'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' दुसऱ्या वर्षात पदार्पण 13 वे पुष्प मुंबईच्या डॉ. नमिता निंबाळकर यांनी गुंफले💥

वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प 15 ऑक्टोबर 2022 या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील प्राध्यापिका डॉ. नमिता निंबाळकर यांनी गुंफले. डॉ. निंबाळकर यांनी 2008 या वर्षी मुंबई विद्यापीठातून डॉ. शकुंतला सिंग यांच्या मार्गदर्शनात ''महात्मा गांधी यांची धर्म संकल्पना आणि सामाजिक सद्भावना" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन त्यांनी 'महात्मा गांधी यांचे धर्मचिंतन' या विषयावर आपले व्याख्यान दिले.


डॉ. निंबाळकर यांनी आपल्या व्याख्यानातून, पहिल्यांदा आपल्या संशोधनाचा अनुभव सांगितला. तसेच त्यांनी आपल्या संशोधन कार्यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्यातील प्रकरण याविषयी माहिती दिली. आपल्या व्याख्यान विषयाला अनुसरून त्या म्हणाल्या की, तत्कालीन समाजामध्ये गांधींना धार्मिक सद्भावना दिसून आली नाही. म्हणून त्यांनी समाजात धार्मिक सद्भावना नसण्याला काही कारण आहे का ? याविषयी चिंतन केले. परिणामी त्यांना राजकीय आणि आर्थिक परिस्थिती हे धार्मिक सद्भावना विकसित न होण्याचे कारण आहेत असे वाटले. 

गांधीजी धार्मिक आचरणामध्ये नैतिकता आणि विवेकपूर्णता आवश्यक मानत असत. नीतीपूर्ण आणि विवेकपूर्ण मार्गानेच धर्म आणि धर्माच्या आधारे व्यक्तीचा विकास होत असतो अशी त्यांची भावना होती. धार्मिक आचरण करणाऱ्यांसाठी प्रार्थना आवश्यक असते असे गांधी मानत असत. त्यांनी वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन प्रकारच्या प्रार्थना सुचविल्या. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये ते मौन  आणि ध्यान यांना महत्त्व देत असत. सामूहिक प्रार्थनेमध्ये मात्र ते सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेण्याचे आवाहन करीत असत. गांधी सनातनी हिंदू होते परंतु त्यांनी मंदिरात जाऊन मूर्ती पूजा करण्याला फारसे महत्त्व दिले नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये हरिजनांना मंदिर प्रवेश नव्हता; म्हणून "जोपर्यंत हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत मी मंदिरात जाणार नाही !" जणू अशी प्रतिज्ञा गांधींनी केली होती. यातूनच गांधींचे धर्मचिंतन हे व्यक्ती केंद्रित होते असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले. 

भारतातील विविध धर्मांमध्ये जीव हिंसा होत असते. याविषयी देखील गांधींनी चिंतन केले होते. गांधींनी गोरक्षणाच्या माध्यमातून सबंध जीवांच्या हिंसेवर निर्बंध लावावेत असे आवाहन केले होते. परंतु हे निर्बंध नियम किंवा कायद्याने लागू शकत नाहीत असेही त्यांना वाटत असत. धर्मा-धर्मातील तेढ आणि हिंसा रोखण्यासाठी धर्म अनुयायांमध्ये सकारात्मक संवाद होणे आवश्यक असतो. संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात असे गांधींना वाटत असत; याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधत डॉ. नमिता निंबाळकर यांनी गांधींचे विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत प्रतिपादित केले.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व इतर राज्याच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा शिकारे या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थिनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या