💥दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी अचूक सर्व्हेक्षण करावे - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥जिल्ह्यात आशाताई करणार दिव्यांग व्यक्तींचे सर्व्हेक्षण💥

परभणी (दि.12 आक्टोंबर) : जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलित करण्यासाठी आशाताई यांच्यामार्फत जिल्ह्यात दिव्यांग सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणा द्वारे दिव्यांग व्यक्तींची अचूक माहिती संकलीत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.


येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग व आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र परभणी आणि महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आशाताई यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते दिव्यांग सर्व्हेक्षणाची सुरुवातही करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे  यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यातील सुमारे 20 हजार दिव्यांगाना जिल्हा प्रशासनाने प्रमाणपत्र वितरीत केले असून, जिल्ह्यात किमान 1 लाख दिव्यांग व्यक्तींची नोंद या सव्हेंक्षणाद्वारे होण्याची शक्यता आहे. दिव्यांग व्यक्तींची वैयक्तीक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलीत करण्यासाठी जिल्ह्यात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. शासनाने दिव्यांग व्यक्तींना काही सुविधा, हक्क, योजना दिल्या असून, त्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. या सर्व्हेक्षणामुळे दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच योजना तयार करुन त्या राबविण्यासाठी मदत होणार आहे. तेव्हा दिव्यांग व्यक्तींचे अचूक सर्व्हेक्षण होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असलेला 5 टक्के राखीव निधी दिव्यांग व्यक्तीसाठी वापरण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या उज्ज्वल भविष्यासाठी संवेदनशीलतेने सर्वेक्षणाचे काम करावे असे ही जिल्हाधिकारी गोयल यावेळी म्हणाल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, दिव्यांगांची सेवा करणे हे आपणां सर्वांचे सामाजिक दायित्वाचे काम आहे. या सर्व्हेक्षणामुळे आपण प्रत्येक घराघरात पोहोचून दिव्यांग व्यक्तींची नोंद करणार आहात. त्यासाठी प्रत्येक आशाताईंवर मोठी जबाबदारी आहे. हे सर्व्हेक्षण अधिकाधिक अचूक व्हावे यासाठी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, तसेच नव्याने काही योजना तयार करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग सर्वेक्षणाबाबत डॉ. कल्याणी मांडके यांनी ऑनलाईन सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व्हेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘परभणी जिल्हा दिव्यांग सर्व्हेक्षण’ या ॲपची माहिती देण्यात आली. तसेच या दिव्यांग सर्व्हेक्षण ॲपचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी डॉ. राहूल गिते यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय अग्रवाल यांनी केले, या प्रशिक्षण कार्यशाळेस महात्मा गांधी सेवा संघचे समन्वयक सागर कान्हेकर, विलास वाकडीकर, विष्णू वैरागड तसेच जिल्ह्यातील आशाताई यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या