💥परभणीत शालेय पोषण आहारातील काळ्या बाजारात जाणारा २५७ क्विंटल तांदूळ जप्त....!


💥जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाची धाडसी कारवाई💥

परभणी (दि.20 सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय स्वस्त धान्य माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवण्यास सुरूवात केली असून जिल्ह्यात मागील एक आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळाचा साठा चढ्या भावाने काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या साठेबाजांवर धाडसी कारवाई करीत मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य साठा जप्त केला आहे. 


या धाडसी मोहीमेत स्थागुशाने काल सोमवार दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील गडी मोहल्ला भागात केलेल्या कारवाईत पथकाने २५७ क्विंटल राशन तांदूळ जप्त केला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस स्थानकात चार आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक शहरातील सोमवारी (दि.१९) शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असतांना परिसरातील गडी मोहल्ला, आझाद कॉर्नर परिसरातील गोदामात गरीबासाठी स्वस्त धान्य दुकानातील राशन तांदूळाचा साठा करण्यात आल्याची माहिती पथकास मिळाली. या माहितीच्या अधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी गोदामात असलेल्या व्यक्तीची चौकशी करून त्यास कारवाई संदर्भात माहिती देवून पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गोदामात ५१२ पोत्यातून गरीबांसाठी उपलब्ध करण्यात येणारा तांदूळ असल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान पथकाने ३ लाख ८६ हजार ९२५ रूपयांचा २५७.९५ क्विंटल तांदूळ जप्त केला. याचबरोबर २९ हजार २६० रूपयांचे रिकामे पोते, पोते शिवण्यासाठीची मशीन, प्लेट काटा आदी साहित्य आणि ९४ हजार ५०० रूपयांचे शालेय पोषण आहारातील मुगदाळ व वटाणे यांचे एकूण ७० पोते असा एकूण ५ लाख १० हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपींवर गुरनं ३९२/२०२२ मध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियमचे कलम ३,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शेख मतीन शेख रशीद, अब्दुल अजीज अब्दुल रशीद यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पो नी स्थगुशा वसंत चव्हाण, पो उप नी मारोती चव्हाण, साईनाथ पुयड, पोलीस अमलदार विलास सातपुते, रवी जाधव, दिलावर खान, मोबीन, परसोडे, खुपसे, गायकवाड, ढवळे, आव्हाड यांच्या पथकाने केली....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या