💥परभणीत ऊसतोड कामगारांच्या समस्या तसेच नोंदणी व ओळखपत्र वाटपाबाबत मेळाव्याचे आयोजन....!


💥कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले💥


परभणी (दि.20 सप्टेंबर) : परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या हि मोठ्या प्रमाणात आहे. ऊसतोड कामगार हे राज्यातील विविध जिल्ह्यात स्थलांतरित होवून काम करतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे होवून त्यांच्यात बालविवाह, कुपोषण यासारख्या जटील समस्या निर्माण होतात. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच ऊसतोड कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, जिल्हा परिषद परभणी आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिंतूर तालूक्यातील मौजे सोनापूर तांडा येथे दि. 18 सप्टेंबर, 2022 रोजी ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघनाताई बोर्डीकर-साकोरे ह्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप घोनसीकर यांनी ऊसतोड कामगारांची ससेहोलपट थांबविण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ऊसतोड कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सदर मेळाव्यात मोठ्या संख्यने सहभागी झालेल्या पुरुष व महिला ऊसतोड कामगारांच्या व त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधांबाबत असलेल्या अडचणी त्यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व इतर विभागातील अधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संतगाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.  आमदार मेघनाताई बोडींकर-साकोरे यांनी ऊसतोड कामगार यांच्या पाल्यांत शिक्षणाचे प्रमाण वाढले तर बालविवाहाचे प्रमाण घटतील असे सांगून ऊसतोड़ कामगारांना आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे प्रतिपादन केले. तसेच ऊसतोड कामगारांचं स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नरेगा, फळबाग लागवड यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुकर उमरीकर, विस्तार अधिकारी सेलू यांनी केले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनाने ऊसतोड कामगार मेळाव्याचा समारोप करण्यात आला....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या