💥हिंदुराष्ट्र ही संकल्पना अखंड भारताच्या लोकशाहीला घातक - दिशा पिंकी शेख


💥प्रस्थापितांनी हिजडा समूह हजारो वर्षांनंतर ही मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवला असेही दिशा यांनी म्हटले💥

औंढा : भारत देश हा बहुरंग असलेले राष्ट्र आहे. जागतिक स्तरावर त्याची विविधता हीच खरी ओळख आहे. धर्मनिरपेक्ष तत्वामुळे सर्वधर्मसमभाव उन्नत होतो. प्रस्थापितांनी हिजडा समूह हजारो वर्षांनंतर ही मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवला आहे असे प्रतिपादन तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी महामंडळ महाराष्ट्र राज्य सदस्या दिशा पिंकी शेख यांनी केले.

आजादी का अमृत महोत्सव व प्राचार्य के. एस. शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त नागनाथ महाविद्यालयातील कै. प्राचार्य सखाराम बागल सांस्कृतिक सभागृहामध्ये राष्ट्रीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश जाधव (अध्यक्ष, यशोदीप शिक्षण संस्था) होते, प्रमुख मार्गदर्शक दिशा पिंकी शेख (ख्यातनाम कवयित्री, वक्ता, प्रवक्ता, श्रीरामपूर), सुप्रसिद्ध नाटककार नारायण जाधव येळगांवकर, बुलडाणा, संचालक मुरलीधरअण्णा मुळे, युवा नेता आदित्य आहेर, प्राचार्य डॉ. व्ही. एस. कानवटे, उप-प्राचार्य डॉ. एन. एम. मोघेकर व मुख्य समन्वयक प्रा. डॉ. सुरेश शेळके मंचावर उपस्थित होते.

तृतीयपंथी समाजाचा बुलंद आवाज दिशा पिंकी शेख पुढे म्हणाल्या की 'स्व' चा शोध घेणे अतिशय महत्वाचे आहे. मानवी जीवनाच्या वाटचालीत सृजनात्मक आणि नवनिर्मितीचा शोध स्त्रियांनी लावला आहे. अलीकडील काळात स्वार्थी वाटचालीतून स्त्रियांचे कर्तुत्व पुरुष प्रधान संस्कृतीने दाबण्याचा प्रयत्न केला. मानव हा निसर्गतः स्वतंत्र आहे. तो समाजात जगतांना वेगवेगळ्या बंधनात अडकला आहे, त्याला या बंधनातून मुक्त करून स्वतंत्र जीवन जगण्याचा मार्ग   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून प्रशस्त केला असे म्हणत वर्तमान समाजाने आमच्या ही समुहांचे अनेक प्रश्न व वेदना समजून आम्हाला आदराने स्वीकारावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश जाधव म्हणाले की, विविध दुर्लक्षित घटकांच्या मानवी हक्कासाठी नागरिकांनी जागृतपणे वर्तन केले पाहिजे. प्राचार्य डॉ. व्ही. एस. कानवटे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आलेख प्रस्तुत केला. राष्ट्रीय व्याख्यानमालेची भूमिका मुख्य समन्वयक डॉ. सुरेश शेळके यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दत्ता कुंचेलवाड यांनी केले तर आभार प्रा. विजय राठोड यांनी मानले.

यावेळी शहरातील नगरसेवक रफी कुरेशी, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वाढे, आतिख रहेमान, सम्यकचे भूषण पाईकराव, गंगाधर देवकते, ऍड.डॉ. शेख रफी, अनिल कांबळे, आनंद ढेंबरे, सुनील मोरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी,  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यासह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, आखाडा बाळापूर येथील विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने  करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या