💥‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाला सुरुवात : स्त्रीयांच्या आरोग्याकडे लक्ष गरजेचे - शिवानंद टाकसाळे


💥18 वर्षा वरील सर्व महिलांची होणार आरोग्य तपासणी💥

परभणी (दि.27 सप्टेंबर) : स्त्री शक्तीची जाण ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक मातेची आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. नवरात्र उत्सवात राबविल्या जाणार्‍या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आरोग्य शिबिर अभियानामध्ये सर्व प्रकारचे आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहनही केले.

              नवरात्री उत्सवानिमित्त अठरा वर्षांवरील महिलांच्या आरोग्य तपासणी करिता 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष अभियानाचे राज्य सरकारने राज्यभर आयोजन केले आहे. सीईओ टाकसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा आज मंगळवार दि.27 सप्टेंबर 2022 रोजी  जिल्हा रुग्णालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, अतिरिक्त जिल्हा शलचिकित्सक डॉ. जयश्री यादव, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कृष्णा पवार डॉ.संजय मस्के, डॉ. संदीप मोरे, डॉ. रावजी सोनवणे, डॉ. मोइज, डॉ. श्रीमती मालपाणी, श्रीमती कुलकर्णी, शिल्पा टाके यांच्यासह इन्चार्ज सिस्टर, एनसीडी स्टॉफ व बहुसंख्येने लाभार्थी महिलांची उपस्थिती होती.

               आरोग्य शिबिराचे आयोजन परभणी जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे या ठिकाणी करण्यात आले आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये उंची, वजनाचे मोजमाप, रक्तदाब तपासणी हिमोग्लोबिन व इतर तपासणी, रक्तगट तपासणी होणार आहे. कॅल्शियम गोळ्यांचे पूरक मात्रांची वितरण करणे, पोषण, स्तनपान प्रसूतीची अति जखमीची लक्षणे याबाबत प्रस्तुत होणार्‍या मातांना तज्ञाकडून समुद्रेशन तसेच अति जोखमीच्या मातांना जवळच्या संदर्भ सेवा केंद्रात पाठवून स्त्री रोग तज्ज्ञांच्यामार्फत तपासणी करून उपचार सुरू करण्यात येणार आहेत. सात ग्रॅम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असणार्‍या गरोदर मातांना आयर्न सुक्रोजचे डोस रुग्णालयात देणे तसेच किशोरवयीन मुलींमधील गर्भधारणा रोखणे, तंबाखू- मद्य सेवनामुळे गर्भधारणेस होणारे धोके प्रसूतीपूर्व कालावधीतील व नंतरचा संतुलित आहार या सर्व संबंधी माहिती देणे, तसेच तीस वर्षावरील महिलांमधील उच्च रक्तदाब मधुमेह याची तपासणी करून उपचार सुरू करण्यात येणार आहे. महिलांची दंत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच साठ वर्षावरील महिलांचे डोळे तपासणे, कर्णबधिता तपासणी, वृद्धापकाळा संबंधी आजाराविषयी तपासण्या करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 18 वर्षावरील महिलांना आरोग्य विषयक सेवा देण्याकरिता आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीराचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या