💥महिलांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर शेअर केले ; जिंतूरमधील धक्कादायक प्रकार....!


💥या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे💥

जिंतूर प्रतिनिधी/ बि.डी.रामपूरकर

सोशल मीडियाचा जेवढ्या चांगल्या गोष्टीसाठी वापर होतो त्याही पेक्षा वाईट गोष्टींसाठी केला जातोय हे वारंवार दिसून येतंय. महिलांच्या बाबतीत खरच सोशल माध्यमं सुरक्षित आहेत का ? असा प्रश्नही उपस्थित होतोय. त्याचे कारण म्हणजे सोशल माध्यमांमधील महिलांचे फोटो जमा करून त्यांना मॉर्फ करत विदेशी नंबरवरून ते वाईट पद्धतीने शेअर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

परभणीच्या जिंतूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिलांचे फोटो सोशल माध्यमांमधून जमा करून त्याला अश्लीलतेची जोड देत ते पुन्हा सोशल माध्यमांमध्ये प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. +48 या आंतरराष्ट्रीय कोड नंबरवरून अशा प्रकाराने मॉर्फ केलेले फोटो व्हाट्सअ‍ॅपवर पाठवले जात आहेत अनेक महिलांसोबत हा प्रकार घडल्याने शेवटी याबाबत जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. एका तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार करत आहेत. 

पोलिसांकडून आवाहन :-

व्हाट्सअ‍ॅप वापरताना विशेषतः महिलांनी योग्य व्यक्तीला आपला नंबर देतोय का ? तो सेव करणे आवश्यक आहे का ? फोटो, व्हिडीओ शेअर करताना कोण कोण ते पाहतय हे व्यवस्थित तपासले पाहिजे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमावर कुणालाही ऍड करताना तो व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे का ? हे पाहून आपल्या मोबाईलची प्रायव्हेसी सेटिंग करून घेणे गरजेचे. प्रोफाइल अनोळखी व्यक्तीसाठी लॉक करायला हवे, अशा अनेक सुरक्षित बाबींचा विचार करूनच सोशल माध्यम हाताळायला हवे, असे आवाहान पोलिसांकडून करण्यात आलंय. 

सोशल मीडिया हाळतांना काळजी घ्यावी :-

व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट यासह इंस्टाग्रामची सध्या जोरदार चलती आहे. आज बहुतांश नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात. स्वतःचे, मित्र मैत्रिणीं बरोबर, कुटुंबाबरोबरचे, ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबतचे अनेक फोटो आपण या माध्यमांमध्ये टाकत असतो. काही महत्वाचे निर्णय, घोषणा आदी देखील याच माध्यमातून केल्या जातात. महिलांच्या बाबतीत यातील अनेक माध्यमांनी सुरक्षितपणे आपले अकाउंट वापरण्याची सोय केलेली आहे. मात्र तिथून देखील कोण तुमचे फोटो,व्हिडीओ काढून त्याला छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने पुन्हा ते याच माध्यमांमध्ये प्रसारित करेल याचा आता नेम राहिला नाही. त्यामुळे महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असे पोलिसांचे मत आहे...,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या