💥ऊसतोड कामगारांच्या समस्या,नोंदणी व ओळखपत्र वितरणाकरीता विशेष ग्रामसभा व मेळावा संपन्न....!


💥परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या मौ.ब्रम्हपुरीत ऊसतोड कामगार मेळावा व विशेष ग्रामसभा संपन्न💥

परभणी (दि.26 सप्टेंबर) : जिल्ह्यातुन दरवर्षी दुसऱ्या जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या हि मोठ्या प्रमाणात आहे. ऊसतोड कामगार हे राज्यातील विविध जिल्ह्यात स्थलांतरित होवून काम करतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे होवून त्यांच्यात बालविवाह, कुपोषण यासारख्या जटील समस्या निर्माण होत असतात. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच ऊसतोड कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2022 शनिवार रोजी  सकाळी  10.00 वाजता ऊसतोड कामगारांच्या मेळावा व विशेष ग्रामसभेचे आयोजन मौजे ब्रम्हपुरी तर्फे पाथरी ता.परभणी येथे करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी दत्तु शेवाळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुठ्ठे,  गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे आणि जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक आणि संवेदनशील मनाने काम  करुन ऊसतोड कामगारांचे स्थालंतर थांबविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ उदा. नरेगा, फळबाग लागवड, शेततळे याबाबत ऊसतोड कामगारांना माहिती देवून सदर योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. तसेच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शाळा, अंगणवाडी, पोषण आहार इत्यादी सुविधांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी सर्व शासकीय यंत्रणाना दिल्या.  

मेळाव्यात मोठ्या संख्यने सहभागी झालेल्या पुरुष व महिला ऊसतोड कामगारांच्या व त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधांबाबत असलेल्या अडचणी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून जाणून घेतल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व ईतर विभागातील अधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन  करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  गीता गुठ्ठे  यांनी केले. प्रास्तावीकात  सतत मागील कमीत कमी ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ऊसतोडीचे काम केलेल्या ऊसतोड कामगारांनी संबंधीत गावच्या ग्रामसेवकाकडे ऊसतोड कामगार नोंदणी अर्ज भरुन ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे असे श्रीमती गुठ्ठे यांनी आवाहन केले.

याa मेळाव्यास व ऊसतोड कामगारांच्या विशेष ग्रामसभेस गावातील सरपंच सुनिता चव्हाण, उपसरपंच मारोती जाधव व ऊसतोड महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मान्यवरांच्या उपस्थिती  बालविवाह प्रतिबंधक व स्वच्छता अभियानाची शपथ घेऊन ऊसतोड कामगार मेळावा व विशेष ग्रामसभेचा समारोप करण्यात आला.  गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे आभार मानले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या