💥दादागिरी करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार - अंबादास दानवे


💥विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आ. संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल💥

✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा-  शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचा आहे. या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज बुलढाणा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मोठया संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावली.

मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, या ठिकाणी कोणी मोजायला आलं आहे का? कुणीतरी येथे येऊन आधी गिनुन घ्या, एखाद्याला चूनुन घ्या, तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो, मग पाहतो कोण भारी ठरते ते असं आव्हानच अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांना व  शिंदे गटाला दिले.

सत्ता मिळविण्यासाठी, खुर्च्या मिळविण्यासाठी आम्ही शिवसेनेचं कामं केलं नाही. आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेचे काम करीत आहोत. सत्तेवर कायमची खुर्ची घेऊन कुणी आलं नाही. आपल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी राहिले नसले तरी त्यांना निवडून देणारी जनता मात्र आपल्यासोबत असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. 

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार नगरपालिकेत बसून अनधिकृत कामे करतात. बुलढाण्यात मटका उघड चालतो व  एसपी ऑफिसच्या बाजूला अवैध धंदे चालतात. पोलीस झोपले आहेत का? असा सवाल त्यांनी केला. 

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत असताना येथील उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून पळविण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

योग्यवेळी ५० खोक्यांचे पुरावे समोर येतील. ज्यांनी दिले त्यांचेच लक्ष या खोक्यांवर आहे, तेच सांगतील. गद्दार आमदारांच्या डोक्यावरील गद्दारीचा टिळा पुसला जाणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाची तयारी करा, लोकसभेची तयारी करा व संघटना मजुबुत करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

यावेळी बुलढाणा विधानसभा संपर्कप्रमुख  राजेंद्र रावराणे (मुंबई), बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जलिंधर बुधवंत, जिल्हाप्रमुख वसंत भोजने, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छगनराव मेहत्रे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बडे, युवासेना जिल्हा अधिकारी नंदुभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील याच बरोबर सर्व  उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या