💥कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात....!💥निर्बंधमुक्त उत्सवामुळे 25 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज💥 

✍️ मोहन चौकेकर                                    

कोल्हापूर :- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरू असलेली जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात देशाच्या कानाकोपऱयातून 17 ते 18 लाख भाविक दर्शनासाठी दाखल होतात, तर यंदा महापूर आणि कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सुमारे 25 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.त्यानुसार मंदिर परिसरात देवस्थान व्यवस्थापन समिती जिल्हा प्रशासन, तसेच पोलीस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, दर्शन रांगेसाठी ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात मंडप उभारण्यात आला आहे.

शारदीय नवरात्रोत्सव काळामध्ये यंदा दर्शन रांग भवानी मंडप येथून सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी संघासमोरील बाजूला 2019 प्रमाणे दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. येथून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. गेल्या वर्षी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दर्शन रांग करण्यात आली असता, भाविकांची गैरसोय झाली होती. व्यापाऱयांनीही याला विरोध केला होता. त्यामुळे यंदा प्रशासनाने भवानी मंडप येथूनच दर्शन रांग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भवानी मंडप ते सरलष्कर भवन येथे बॅरिकेड्स लावून मंडप उभारण्यात आला असून, भाविकांना पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. परंपरेनुसार मंदिरातील सर्व स्वच्छता पूर्ण झाली असून, देवीच्या दागिन्यांचेही पॉलिश करण्यात आले आहे.

* गर्दीचे नियोजन :-

नवरात्रोत्सवात लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत रांगा लागतात. पालखी सोहळा, पंचमी, अष्टमी, नगरप्रदक्षिणा, दसरा अशा महत्त्वाच्या दिवशी, तर भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होते. कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने यंदा भाविकांची संख्या दहा -बारा लाखांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे देवस्थान समिती, तसेच प्रशासनातर्फे नियोजन केले जात आहे.

* आकाशातून 'ड्रोन'ची नजर :-

देवस्थान समितीकडून यंदा ड्रोन कॅमेऱयांचा वापर नवरात्रोत्सवाचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरा वापरासाठी देवस्थानच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप, अभिजित पाटील यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सध्या एकूण 80 आयपी स्वरूपाचे कॅमेरे व पीटीझेड फिरत्या स्वरूपाचे कॅमेरे कार्यरत आहत. ड्रोन कॅमेऱयांचा वापर सुरक्षेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. उत्सव काळामध्ये सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे जादा चार कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते या ड्रोन कॅमेऱयांचे उद्घाटन करण्यात आले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या