💥येलदरी व सिध्देश्‍वर धरण भरल्याने कोणत्याही क्षणी पाणी सोडणार....!


💥पूर्णा नदीच्या पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार💥

  जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्‍वर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे पाटबंधारे खात्याद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार आहे.

          बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच येलदरीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळेच येलदरी व तेथून सिध्देश्‍वर जलाशयात पाण्याची आवक होत आहे. एकूण पाणीसाठा व संभाव्य पाण्याची आवक ओळखून जलाशयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाटबंधारे खात्याने येलदरी व सिध्देश्‍वर जलाशयातून दरवाजे उचलून कोणत्याही क्षणी पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्याच्या या संभाव्य कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदी काठच्या गावच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा बजावला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने, जनावरे सोडू नयेत, कोणतीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

         दरम्यान, येलदरी जलाशयात मंगळवारी सायंकाळपर्यंत 461.580 मीटर पाणी पातळी तर 914.647 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. एकुण पाण्याची टक्केवारी 97.56 टक्के एवढी आहे. तर सिध्देश्‍वर जलाशयात 413 मीटर पाणी पातळी, 250.712 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून त्या पाणीसाठ्याची टक्केवारी 99.83 टक्के एवढी आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या