💥सेवा पंधरवाडा अंतर्गत नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेणे आणि क्षेत्रीय भेटी देणेबाबत देखील दिले निर्देश💥 

परभणी (दि.16 सप्टेंबर) : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची कामे कालमर्यादेत व्हावी याकरीता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे, त्यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्याकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांविषयी प्रलंबित कामांचा कालमर्यादेत निपटारा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणा-या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करणे व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देणे, सर्व संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा पंधरवड्याचे यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करणे व या संबंधातील प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेणे आणि क्षेत्रीय भेटी देणेबाबत देखील निर्देश दिले आहेत. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये माहिती होण्याकरीता सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसार माध्यमांमधून प्रसिध्दी देणेबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या