💥जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....!


💥जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत💥

परभणी (दि.२० सप्टेंबर) : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात 96.31% जिवंत पाणी साठा झाला असुन सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 80,672 क्युसेक्सने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जायकवाडी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. तरी धरणाचे जलाशय प्रचलन आराखड्यानुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत सद्यस्थितीत सुरु असलेल्या विसर्गात टप्या-टप्याने वाढ करण्यात येऊन 1,25,000 ते 1,50,000 क्युसेक्स पर्यंत विसर्ग करण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 19 ते 23 सप्टेंबर, 2022 या कालावधीत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात (ज्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे) विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तसेच धरणाच्या निम्न बाजुचे गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधारे, परभणी जिल्ह्यातील सर्व उच्च पातळी बंधारे, येलदरी व निम्न दुधना धरण, आणि ईतर मध्यम प्रकल्प हे सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असुन संबंधित विभागाकडून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सदर विसर्गामुळे कमी उंचीचे पुल हे पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पुर नियंत्रण यंत्रणा अधिक सतर्क असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात गोदावरी, पुर्णा, दुधना आणि इतर नदीकाठच्या गावातील नागरीकांची जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. तसेच नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवणेबाबत कार्यवाही करावी. त्याचप्रमणे सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना मंदिरावरील भोंगे, दवंडी, समाज माध्यमे इत्यादीद्वारे सावधानतेचा इशारा देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ परभणी यांनी परिस्थीतीचा आढावा घेऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणीचे महेश वडदकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या