💥परभणी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे ०९ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण होणार....!


💥पिक नुकसान सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन : रॅन्डम पध्दतीने ठिकाणे निवडणार💥

 परभणी (दि.०७ सप्टेंबर) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पिक नुकसानीचे सर्वेक्षण तसेच नुकसान भरपाई ठरविण्याकरीता विमा कंपनीचे प्रतिनिधी व राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांद्वारे ०९ सप्टेंबर पर्यंत त्या त्या महसूल मंडळात रॅन्डम पध्दतीने १० वेगवेगळ्या ठिकाणी पिकांची पाहणी केली जाणार असून त्याद्वारे त्या-त्या महसूल मंडळ निहाय पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित केली जाणार आहे.

           परभणी जिल्ह्यात १० ऑगस्ट पासून ०५ सप्टेंबर पर्यंत पावसाने दिलेल्या खंडामुळे हलक्या व मध्यम जमीनीवरील सोयाबीन पिक सुकून केले. त्यामुळे त्या जमीनीवर काहीही उत्पन्न येणार नाही. तसेच भारी जमीनीवरसुध्दा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, असे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दाखल केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले होते. पावसातील खंडाच्या कालावधीमध्ये पिके जळून गेल्याच्या व उत्पादनात घट येणार असल्याच्या बातम्यासुध्दा दैनिक दिलासासह अन्यत्र मोठ्या प्रमाणावर प्रसिध्द झाल्या. या पार्श्‍वभूमीवर माहे ऑगस्ट २०२२ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरील नुकसानीचे पंचनामे करावे, असा आग्रह लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आला.

            परभणी तालुक्यात पेडगाव, जांब, झरी, सिंगणापूर, पिंगळी या महसूल मंडळात १६ ते २३ दिवस,गंगाखेड तालुक्यात माखणी, राणीसावरगांव पिंपळदरी येथे १८ ते २१ दिवस, पाथरीत मावळगाव, हादगाव, कासापुरी येथे १७ ते २० दिवस जिंतूरात जिंतूर, सावंगी म्हाळसा, बोरी, दुधगांव येथे १८ ते २० दिवस, पूर्णेत पूर्णा, चुडावा, कावलगाव येथे १८ ते २७ दिवस, पालमध्ये चाटोरी, बनवस येथे १६ ते १८ दिवस, सेलूमध्ये सेलू, देवगाव गात, कुपटा, चिकलठाणा व मोरेगावात १५ ते १६ दिवस, सोनपेठ व शेळगावात १८ ते २३ दिवस तसेच मानवत तालुक्यात कोल्हा व रामपुरी बु. मंडळात २० ते २६ दिवस पावसाचा खंड राहीला.

            जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या पार्श्‍वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक बोलावली होती. त्यात सर्व सदस्य उपस्थित होते. समिती सदस्य व तालुका कृषि अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या चर्चेनुसान सोयाबीनच्या उत्पादनात घट येणार असल्याचा सर्वसाधारणपणे सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. शासन निर्णयानूसार नमूना सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्राप्त आहेत. त्या करीता पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण नुकसान भरपाई ठरविण्या करीता विमा कंपनीचे प्रतिनिधी व राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

           संबंधित मंडळ कृषि अधिकारी हे समितीचे अध्यक्ष तर आयसीआयसीआय लोम्बार्ड (विमा कंपनी) यांचे प्रतिनिधी, कृषि पर्यवेक्षक, तलाठी, कृषि सहाय्यक, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञाने केंद्र शास्त्रज्ञ हे या समितीचे सदस्य असतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी यांनी संयुक्त समितीचे सनियंत्रण आदेश निर्गमीत करुन त्याचे सनियंत्रण करावे व ०९ सप्टेंबर पर्यंत प्रपत्रात नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे यावेळी ठरविण्यात आले.

         दरम्यान, या समितीने अधिसूचित ठिकाणच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ०५ टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण करुन नुकसानीचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. सर्व विमाक्षेत्र घटकातील रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० वेगवेगळ्या ठिकाणी पिकांची पाहणी करुन महसूल मंडळ निहाय पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या