💥मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य - सहकार मंत्री अतुल सावे


💥मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत आयोजित कार्यक्रमात मंत्री सावे म्हणाले💥


परभणी (दि.17 सप्टेंबर) :-  मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या थोर हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने अखंड लढा दिला त्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील राजगोपालचारी उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सहकार मंत्री अतुल सावे हे बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री मेघनाताई बोर्डीकर, राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, बाबाजानी दूर्रानी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुम्माका सुदर्शन, अविनाश कुमार, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी सहकारी मंत्री अतुल सावे पुढे म्हणाले की, आजपासून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवून हे अमृत महोत्सवी वर्ष आपण उत्सहात साजरा करणार आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. त्याकरीता मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती. परंतू हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. तरीही निजाम शरण येत नाही, आणि नागरिकांवर वाढते अत्याचार पाहून भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होवून भारतीय संघ राज्यात विलीन झाल्याचे श्री. सावे यांनी सांगितले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देवून मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामाच्या जोखडातून मुक्त केले होते. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ही श्री. सावे यावेळी म्हणाले.

  सद्या राज्यातील पशुपालक हा लंपी त्वचा रोगामुळे चिंतेत आहे. लंपी त्वचा रोग हा आजार केवळ गाई आणि बैलांना होतो. या आजाराचा किंवा दूधाचा मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करुन लंपी त्वचा रोगाच्या बाबतीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केले आहे. लंपी त्वचा रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी, तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सर्व शासकीय पशु वैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत जनावरांवर तात्काळ उपचार करुन घ्यावे. बाधीत क्षेत्राच्या केंद्रबिंदूपासून 5 किलोमिटरच्या परिसरात सर्व गोवंशीय जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. पशुपालकांनी भीती न बाळगता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ही सहकार मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केले.

यावेळी परभणीचे सुपत्र कर्नल समीर गुजर यांनी भारतीय सैन्यात मौलाची कामगीर केल्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘मेन्शन इन डिस्पॅच’ हे पदक बहाल केले आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजेने अंतर्गत कर्नल समीर गुजर यांना यावेळी सहकारी मंत्री अतुल सावे यांनी सहा लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार निलकंठ पाचंगे यांना मराठवाडा मुक्ती संग्रामवर अधारित तयार आलेल्या चित्रफित संपादन मंडळामध्ये योगदान दिल्याबद्दल सहकार मंत्री अतुल सावे यांचा गौरव करण्यात आला. 

प्रारंभी सहकार मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन  हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवत तसेच हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी श्री. सावे  यांनी  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,  लोकप्रतिनिधी, अधिकारी,  पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे  यांच्यासह  पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या