💥गीतारहस्य हा तत्त्वज्ञानातील एक उत्कृष्ट ग्रंथ आहे - डॉ. शर्मिला वीरकर

 


 💥वाशिम येथे 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 11 वे पुष्प संपन्न💥

वाशिम (दि.१६ आगस्ट) - मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प  स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा प्रसंगी विशेष होते. हे पुष्प मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. शर्मिला वीरकर यांनी गुंफले. डॉ. वीरकर यांनी 2007 या वर्षी मुंबई विद्यापीठातून डॉ. शुभदा जोशी यांच्या मार्गदर्शनात "क्रिटिकल व्हॅल्युएशन ऑफ दि गीतारहस्य" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 ऑगस्ट 2022 या दिवशी त्यांनी ''गीतारहस्यमीमांसा'' या विषयावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. शर्मिला वीरकर यांनी आपल्या व्याख्यानातून, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिण्यासाठी टिळकांना कशी प्रेरणा मिळाली. हा ग्रंथ त्यांनी किती व कोणत्या कालावधीत लिहिला. या ग्रंथाची भाषा आणि विषय कोणते, यावर पहिल्यांदा प्रकाश टाकला. यानंतर गीतारहस्य या विषयावर संशोधन करीत असताना त्यांना जो अनुभव आला त्याचा त्यांनी उलगडा केला. 

गीतारहस्याची भाषा ही पल्लेदार आहे पण ती कठीण नाही. त्यात तर्कशुद्धता आहे. त्यात नीतिविचार आहेत. त्यात आदर्श पुरुषाचे चित्रण आहे. गीतारहस्यामध्ये टिळकांनी पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या नैतिक संकल्पना आणि गीतेतील नैतिक विचार यात तुलना केली आहे. या तुलनेतुन पाश्चात्त्यांचे नीतिशास्त्र हे भारतीय नीतिशास्त्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही असे दिसून येते. प्रामुख्याने टिळकांनी गीतारहास्याच्या माध्यमातून बायबल, धम्मपद आणि भगवद्गीतेतील 'आदर्श पुरुष' हा कसा आदर्श ठरतो यावर ही चर्चा केली आहे. म्हणून गीतारहस्यमध्ये दिसून येणारी तुलाना ही गौण आहे.  अर्जुनाची विषाद अवस्था ही सामान्यांची विषाद अवस्था आहे. अशा अवस्थेतुन अर्जुन बाहेर पडतो. म्हणून अर्जुन एक व्यक्ती ठरत नाही तर सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून 'तत्त्व' ठेरतो. याविषयीचे अकलन देखील गीतारहस्याच्या अध्ययनातून होते. आणि म्हणूनच 'गीतारहस्य हा तत्त्वज्ञानातील एक उत्कृष्ट ग्रंथ आहे.' असे डॉ. शर्मिला वीरकर यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. 

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी सदर व्याख्यान हे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व इतर राज्याच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या