💥पुर्णा शहराला लोहमार्गा पलिकडील भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाकरीता पूर्णेकर करणार आंदोलन....!


💥रेल्वे जंक्शनच्या दोन्ही बाजूंनी पसरलेल्या वसाहती व महत्वपूर्ण प्रतिष्ठानांमुळे दोन्ही बाजूंनी दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ💥 

 परभणी (दि.24 आगस्ट) : काचिगुडा ते मनमाड या रेल्वे मार्गावरील महत्वपूर्ण जंक्शन म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्णा रेल्वेस्थानकावर रेल्वे पादचारी पूलाच्या मागणीसाठी संतप्त पूर्णेकरांनी आता आंदोलन उभारण्याचा संकल्प सोडला आहे.


                पूर्णा रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर दाट वसाहती आहेत. एकीकडे तहसील कार्यालय, तालुका न्यायालय अन्य महत्वपूर्ण कार्यालय तसेच सिध्दार्थ नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, कृषि नगरसारख्या दाट लोकवस्ती असणार्‍या वसाहती लांबपर्यंत पसरल्या आहेत. तर दुसर्‍या बाजूला शाळा, महाविद्यालय, वसतीगृह, बाजार समिती, मोंढा, बँका वगैरे महत्वपूर्ण प्रतिष्ठाने व नागरी वसाहती पसरल्या आहेत. त्यामुळे पूर्णा शहर हे या जंक्शनमुळे दोन विभागात वाटल्या गेले आहे.

               रेल्वे जंक्शनच्या दोन्ही बाजूंनी पसरलेल्या या वसाहती व महत्वपूर्ण प्रतिष्ठानांमुळे दोन्ही बाजूंनी दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. दुचाकी, चारचाकी वाहने रेल्वेच्या रेल्वे क्रॉसिंग ओलांडून लांबवरुन धावत असतात. परंतु, सर्वसामान्य नागरीक, पादचारी हे या जंक्शनवरील रेल्वेमार्ग ओलांडूनच पायपीट करीत ये-जा करीत असतात. दररोजचेच हे चित्र पूर्णेकरांना अंगवळणी पडले आहे. जंक्शनवरील रेल्वेमार्ग ओलांडल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. हाच पादचार्‍यांकरीता शॉर्टकर्ट आहे. परंतु, रेल्वे मार्ग ओलांडून ये-जा करणे अलिकडे धोकादायक ठरु लागले आहे. कारण या जंक्शनवर रेल्वेगाड्यांचा मोठा ताण आहे. दररोज मालवाहू व प्रवाशी गाड्या मोठ्या प्रमाणावर धावत असतात. या दरम्यानच सर्वसामान्य नागरीक पादचारी रेल्वेमार्ग ओलांडून धोकादायक पध्दतीने ये-जा करीत असतात, ही बाब आता नागरीकांच्या दृष्टीने मोठी समस्या ठरली असून एखादा अपघात, अप्रिय घटना घडू नये, म्हणून जागरुक नागरीकांनी आता या जंक्शनवर रेल्वे पादचारी पुलाची (फुटवेअर ब्रिज) मागणी केली आहे.

त्यासाठी पूर्णा बुध्द विहार समितीचे अध्यक्ष पूज्य भन्ते उपगुप्तजी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली जागरुक नागरीकांनी खासदार संजय जाधव, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत उच्चपदस्थ अधिकार्‍यांना निवेदने पाठवून या पुलाच्या मागणीकडे लक्ष वेधले.

             प्रशासकीय स्तरावरुन या संदर्भात अद्याप कोणत्याही सकारात्मक हालचाली आढळल्या नाहीत, त्यामुळे आता महिला, वृध्द, शाळकरी विद्यार्थी, त्यांचे पालक यांची धोकादायकरीत्या होणारी ये-जा ओळखून जागरुक नागरीकांनी टप्प्या टप्प्याने, लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, अ‍ॅड. हर्षवर्धन गायकवाड, अ‍ॅड. धम्मा जोंधळे, अशोक धबाले, विजयकुमार जोंधळे, भदंत पय्यावंश, साहेबराव सोनवणे, बौध्दाचार्य कांबळे, भिमा वाहूळे, अतूल गवळी, दिलीप गायकवाड, महेबुब कुरेशी, दिपक रणवीर आदींनी या प्रश्‍नावर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या