💥स्मशानभूमी सुंदर बनवा हीच आपल्या पुर्वजांप्रती खरी कृतज्ञता - मा.खा.तुकारामजी रेंगे पाटील


💥कै.कोंडीबाराव सखारामजी शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कर्मकांडाला फाटा देऊन स्मशानभूमी सुशोभीकरणाचे आयोजन💥


परभणी :- तालुक्यातील मौजे परळगव्हाण येथे कै.कोंडीबाराव सखारामजी शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कर्मकांडाला फाटा देऊन स्मशानभूमी सुशोभीकरणाचे आयोजन करण्यात आले. 


          यावेळी परभणीचे मा.खा.तुकारामजी रेंगे पाटील बोलत होते. "स्मशानभूमीत महादेवांचा निरंतर रहिवास असतो. ही भूमी पवित्र आहे, तिची उपेक्षा करणे म्हणजे आपल्या श्रद्धेचा आणि पूर्वजांचा अपमान आहे. स्मशानभूमी सुंदर बनवा, हीच आपल्या पूर्वजांप्रती    कृतज्ञता ठरेल. किर्तनकारांच्या माध्यमातून याची जागृती होणे गरजेचे आहे. स्मशानभूमी सुशोभीकरणाचा पवित्र उपक्रम साहेब शिंदे यांनी हाती घेतला, हे अनमोल कार्य आहे." असे रेंगे पाटील म्हणाले.

          तर कांतरावकाका देशमुख यांनी आपल्या मनोगतातून "गावातील स्मशानभूमी हाच गावकऱ्यांसाठी खरा स्वर्ग आहे. या पवित्र भूमीचा आपल्याच हाताने नरक न बनवता स्वच्छतेने आणि वृक्षारोपणाने स्वर्ग बनवता येतो. ते पवित्र कार्य साहेब शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हाती घेतले आहे. तेरवी ऐवजी स्मशानभूमीत वृक्षारोपण आणि सिमेंट खुर्च्यांचे लोकार्पण करून जगासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. हीच काळाची गरज आहे!" असे कांतरावकाका म्हणाले.

            यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील व कृषीभूषण कांतरावकाका देशमुख हे होते. मुख्य अतिथी म.से.सं. चे प्रदेश कार्याध्यक्ष मा.अर्जुनराव तनपुरे. मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी मा.विठ्ठल भुसारे व डॉ. दिलीप श्रुंगारपतळे, मालेगाव येथील श्री पुरुषोत्तम जाधव, श्री संभाजीराव भोसले, शिवश्री सुभाष ढगे हे होते. तर जि.प.सदस्य मा.रवि पतंगे, कृ.उ.बा. चे संचालक मा. रंगनाथराव भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, शिवसेनेचे दिलीपराव आंबोरे, पिंगळीचे सरपंच मा.जगन्नाथराव गरुड, गोविंदराव दुधाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी.एन.शिंदे, सरपंच मोतीराम शिंदे, पत्रकार सुरेश मगरे, केंद्रीय मुख्याध्यापक दयानंद स्वामी, गावकरी तसेच जिल्हाभरातून विविध मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

           यावेळी मा.अर्जुनराव तनपुरे, मा.प्रा.विठ्ठल भुसारे,मा.डॉ. दिलीप श्रुंगारपतळे, मा.रवि पतंगे आदिंनी अनमोल मार्गदर्शन केले. स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी कांतरावकाका देशमुख, मराठा सेवासंघाचे शिवश्री सुभाषराव जाधव व ताडकळस येथील "शब्दरंग" मित्रपरिवाराच्या वतीने प्रत्येकी एक सिमेंट खुर्ची भेट देण्यात आली.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब यादव यांनी जिजाऊ वंदना गायली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेब शिंदे यांनी केले. तर ह.भ.प. सखारामजी रणेर यांनी सुत्रसंचालन केले. तसेच स्मशानभूमी सुशोभीकरणात गावकरी व शब्दरंग मित्रपरिवाराने अनमोल योगदान दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या