💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस - धानोरा काळे राज्य रस्ता झाला चिखलमय....!


💥मजबुतीसाठी चक्क मातीचा भरणा; लोकप्रतिनिधी-अधिकार्‍याचे मात्र दुर्लक्ष💥

पुर्णा (दि.११ आगस्ट) - तालुक्यातील ताडकळस - पालम राज्य रस्त्याचे गेल्या बरेच दिवसापासून मजबुती करणाचे काम संथ गतीने चालू आहे. त्यातच कळगाववाडी ते धानोरा काळे साधारण चार किमीचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून रोजच अपघात होत आहेत. परभणी - ताडकळस - पालम हा राज्य रस्ता तीन जिल्ह्याला जोडणारा असल्याने या रस्त्याने मोठी प्रवासी वाहतूक आहे. परंतु रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे. त्यातच खोदून ठेवलेल्या रस्त्यावर चक्क मुरूम माती भरल्याने पावसाच्या पाण्याने हा रस्ता चिखलमय झाला असून प्रवाशांना ये -जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गाडी चालवत असताना थोडेही लक्ष विचलित झाले तर मोठा अपघात होत जीव गमावण्याची वेळ येत आहे. याकडे गांभिर्याने संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन तात्काळ रस्त्याचे काम चालू करून अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.

          गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने मुरूम मातीचा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यातच (दि.10) रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र फळा येथे संत मोतीराम महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी परभणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी करत होते.  फळा येथे जाण्यासाठी ताडकळस - धानोरा काळे हा रस्ता महत्त्वाचा असून या रस्त्याने वाहतुकीची दिवसभर वर्दळ पहायला मिळाली. परंतु अर्धवट झालेल्या कामामुळे व चक्क मुरूम माती टाकल्याने चिखलात बरेच भाविक लहान मुलासह महिला अपघात होऊन पडल्याचे पहायला मिळाले. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुढील पावसाळी दिवसात मोठे अपघात होण्याची शक्यता प्रवाशातून व्यक्त होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ चालू करून चांगल्या दर्जाचा रस्ता बनवावा, अशी मागणी होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या