💥दिल्लीवारी करता एनडीआरएफचे निकष का बदलत नाहीत ? -- अंबादास दानवे


💥विरोधी पक्षांच्यावतीने नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते💥

  ✍️ मोहन चौकेकर 

मुंबई : अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीची राज्य सरकारने केलेली घोषणा दिशाभूक करणारी असल्याची टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हे निकष कालबाह्य झाले असताना अनेकदा दिल्लीवारी करता, मग एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न का करत नाही असा सवालही दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

विरोधी पक्षांच्यावतीने नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. पुढे अंबादास दानवे म्हणाले कि, जुलै-ऑगस्टमध्ये विदर्भ व मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती व बागायती पिके , घरे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 नांदेड, परभणी, हिंगोली व बीड या जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांसह केळी, संत्रा व तत्सम फळपिकांचेही नुकसान झालेले आहे.तसेच हजारो ठिबक व तुषार सिंचन संच वाहून गेले आहेत.  राज्यातील हजारो हेक्टर शेतजमीन वाहून व खरडून गेल्याने त्या पुर्णपणे नापीक होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक विहिरी गाळाने भरल्या आहेत.

  शेतकरी, शेतमजूर आणि अतिवृष्टीग्रस्त लोकांना शासकीय मदत मिळण्यासाठी विरोधी पक्षाने आवाज उठवला असता, राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ ) मदत दिली जाईल, अशी घोषणा केली मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. त्यानुसार कपडे आणि घरगुती वस्तूंचे नुकसान झाल्यास १८०० रुपये, भांडी वाहून गेल्यास २ हजार रुपये, गाय किंवा म्हैस वाहून गेल्यास ३० हजार रुपये मदत मिळणार आहे. पण एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले आहेत. ते बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे आधी पाठपुरावा करावा, असे बोल दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

 सध्या या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. त्यानुसार २ हजार ५१२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, बुधवारी सभागृहात २५ हजार कोटींच्या सादर केलेल्या पुरवणी मागण्यामध्ये मदतीचा कुठेही उल्लेख नाही. यावरून सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ओढे व नदी नाले यांनी  पात्रे बदलल्याने काठावरील सुपीक जमीन नापीक झाली आहे. काही जिल्ह्यातील पुल, रस्ते, आणि पांदण रस्ते यांचे नुकसान झाले आहे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर व विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. तर कोकणामध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे भात आणि नागलीची पिके सुकून जाऊ लागली आहेत. अशा स्थितीमध्ये तातडीने ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप करणे आवश्यक असताना सरकार हालचाल का करत नाही, अशा शब्दात दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या