💥शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात : शिवसेना कारभारी बदलला म्हणून म्हणे पक्ष प्रवेश...!


💥परभणी जिल्हा प्रमुख पदावर मुख्यमंत्री शिंदे यांनि नियुक्तीची केल्याची माहिती💥

परभणी (दि.०२ आगस्ट) : एखाद्या घराचा कारभार करणारा व्यक्ती अपयशी ठरल्यास दुसर्‍याकडे जबाबदारी दिली जाते. त्याप्रमाणे शिवसेनेत फक्त कारभारी बदलला आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे, अशी माहिती परभणी जिल्ह्याचे माजी शिवसेना खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेतून दिली. शिवसेनेचा मूळ विचार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत समन्वयाने यापुढे काम केले जाईल, असेही ते म्हणाले.

          अ‍ॅड.सुरेश जाधव यांनी आज मंगळवार दि.०२ आगस्ट रोजी सकाळी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला मान - सन्मान दिला, चांगली वागणूक देखील मिळाली, मात्र स्वतंत्रपणे काम करता यावं म्हणून पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलून हा निर्णय जाहीर केला, असे ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आपण जाहीर प्रवेश केला असून परभणी जिल्हाप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादला आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आपल्या नियुक्तीची घोषणा केली, अशीही माहिती अ‍ॅड. जाधव यांनी दिली.

          लोकसभेत शिवसेनेकडून दोन वेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर काहीकाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम केले. त्यामुळे प्रदीर्घ काळ आपण स्वतंत्रपणे लोकांसमोर येवू शकलो नाहीत, अशी खंत व्यक्त करीत अ‍ॅड. जाधव यांनी सध्याची राजकीय परिस्थिती निर्माण होण्याला निरनिराळी कारणे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ हिंदुत्वाचा विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो? याची उत्सुकता शिवसैनिकांना तर होतीच, पण तमाम हिंदू समाजालाही ती होती बाळासाहेबांनंतर प्रखर नेतृत्व कोण करेल? हा संभ्रम होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या रूपाने एक दृष्ट व डोळस नेता राज्याला मिळाला आहे, हा महाराष्ट्राचा तसेच कार्यकर्त्यांचा कौल आहे. खरे तर हे पक्षांतर नाही तर केवळ पक्षातील अंतर्गत बाब आहे असेही जाधव म्हणाले. एखाद्या घराचा कारभार करणारा व्यक्ती अपयशी ठरल्यास दुसर्‍याकडे जबाबदारी दिली जाते तसेच शिवसेनेत फक्त कारभारी बदलला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मूळ विचार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत समन्वयाने यापुढे काम केले जाईल, अशी ग्वाही दिली.

          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेची साथ या जोरावर आम्ही नक्कीच पुढे जाऊ, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भास्करराव लंगोटे, केशवराव कदम, अरविंद देशपांडे, महादेव भंडारे, अनंत डोईफोडे, प्रकाश फरकंडकर, नरहरी रेंगे, तानाजीराव कदम, प्रदीप कुलकर्णी, शीलाताई शेटे, भानुदास शिंदे, शाहूराव मुंढे, दत्तराव नागमोडे, शेख अफजल, पवन घुमरे, अर्जुन गुरनाळे, चंद्रसेन राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या