💥माणसांच्या हितासाठी वामनदादांनी गझल लिहिल्या - संजय रायबोले

💥वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम संपन्न💥 

अहमदपूर (दि.२९ आगष्ट) - मराठी गझल चळवळीत आंबेडकरवादी जाणीवांच्या असंख्य मराठी गझल वामनदादा कर्डक यांनी लिहून एक नवा इतिहास घडविला असून सुरूवातीच्या काळात प्रेम, आदर आणि राजे महाराजांची स्तुती करणारी गझल एका वेगळ्याच टप्प्यावर नेऊन गझलेला क्रांतीसन्मुख बनविण्याचे काम वामनदादा कर्डक यांनी केलेले आहे. गझलेच्या तंत्रात शब्द गुंफून तंत्रशुध्द पध्दतीने १९४३ पासुन गझल लिहिणारे वामनदादा कर्डक मराठी गझल चळवळीकडून दुर्लक्षित राहिलेले व्यक्तीमत्व आहेत. लोककवी, गायक,शाहीर जलसाकार म्हणून त्यांना मर्यादित न करता ते एक उत्कृष्ट गझलकार होते त्यांनी माणसाच्या हिताच्या असंख्य गझल लिहिल्या असून मराठी गझलेचे उगमपर्व आणि आंबेडकरवादी जाणीवांच्या गझलांचे प्रणेते म्हणुन वामनदादा कर्डक यांचा मरणोत्तर सन्मान व्हायला हवा असे प्रतिपादन संजय रायबोले यांनी अहमदपुर येथे वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रविवारी (ता.२८) रोजी बोलताना व्यक्त केले.

   राजर्षी शाहु महाराज सेवाभावी संस्था व बहुजन कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त "आंबेडकरवादी जाणीवांच्या गझलांचे शिल्पकार वामनदादा कर्डक " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बा.ह.वाघमारे होते तर  प्रमुख वक्ते म्हणुन संजय रायबोले, प्रमुख पाहुणे एस.एन.ससाणे, प्रभाकर कांबळे, प्रा.पांडुरंग कांबळे आदी उपस्थित होते.

 कु. सम्यका श्रावणे हिने बासरी वादन व गीत गायन करून रसिकाला मंत्रमुग्ध केले.महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आंबेडकरवादी चळवळीतील कलावंताना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष तथा कवी गायक सुभाष साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.पांडुरंग कांबळे यांनी केले. संस्थेच्या सचिव वर्षाताई गवळे-साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमास मोठया संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते........टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या