💥महाराष्ट्र राज्यातील बंडाळीत सुध्दा परभणी जिल्ह्यात बंडाचा झेंडाच फडकला नाही...!


💥आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या पाठोपाठ खासदार संजय जाधव यांनी सुध्दा दाखविली ठाकरे घराण्यावर निष्ठा💥

परभणी (दि.२० जुलै) : महाराष्ट्र राज्यातील सत्तारूढ शिवसेनेत एवढी मोठी बंडाळी होवून सुध्दा मागील काळात फितुरीचा कलंक लागलेल्या परभणी जिल्ह्यात मात्र यावेळी विद्यमान आमदार डॉ.राहूल पाटील यांच्यासह विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जिल्ह्यातील मागील पंरपरेप्रमाणे बंडाचे निशाण फडकविण्याऐवजी यावेळी ठाकरे कुटूंबियांविषयीची निष्ठा दाखवून या जिल्ह्यातील पक्षांतर्गत बंडखोरीची परंपरा अक्षरशः खंडीत केली आहे.

         शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्‍वासू  एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या विरोधातच दंड थोपाटून बंडखोरीचे निशाण फडकविले. तेव्हा शिवसेनेंतर्गत एकापाठोपाठ एक आमदारांनी टणाटण उड्या मारीत शिंदे यांच्या समर्थनाची भूमिका जाहीर केली.त्याद्वारे ठाकरे कुटूंबियांना,राजकीय क्षेत्रास एकापाठोपाठ एक असे  जोरदार असे धक्के दिले. या धक्कातंत्रातूनच शिंदे यांनी समर्थकांच्या सहकार्याने शिवसेनेत मोठे खिंडारे पाडले खरे, त्याद्वारे, भाजपाच्या सहकार्याने  सत्तारूढ महाविकास आघाडीस सत्तेबाहेर खेचून मोठे सत्तांतर घडवून मुख्यमंत्रीपदसुध्दा पटकाविले. शिवसेनेसह ठाकरे कुटूंबिय हे सावरण्यापूर्वीच दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्या बंडाचे साद-पडसाद उमटत गेले. मुंबईसह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भाने साथ  दिली.त्याच बरोबर सेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरसह मराठवाड्याने शिंदे यांची मोठी साथ-संगत केली. परंतु,शिवसेनेंतर्गत लोकप्रतिनिधींच्या बंडखोरीच्या परंपरेने संपूर्ण राज्यात नावाजलेल्या परभणी जिल्ह्याने  मात्र शिंदे यांच्या बंडखोरीकडे पाठ फिरवून ठाकरे कुटूंबियांशी निष्ठा दाखवून  जिल्ह्यातील बंडखोरीच्या परंपरेस छेद दिला.

स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनीरोखठोकपणे, स्पष्टपणे  ठाकरे भूमिका जाहीर केली,कायम राखली. अन् त्या पाठोपाठ स्थानिक खासदार संजय जाधव यांनी मंगळवार दि.१९ जुलै २०२२ रोजी नवी दिल्लीत पक्षाच्या १८ पैकी १२ खासदारांनी ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावून खुलेआमपणे शिंदे समर्थने केले तेव्हा  जाधव यांनी स्पष्ट, परखडपणे ठाकरे कुटूंबियांविषयीची निष्ठा दाखवून दिली.

           वास्तविकतः या जिल्ह्यात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या बंडखोरीची मोठी परंपरा राहीली आहे. विशेषतः एकापाठोपाठ एक म्हणजे कै. प्रा.अशोकराव देशमुख, अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील  त्या पाठोपाठ अ‍ॅड. गणेशराव दुधगांवकर या तीघा विद्यामान खासदारांची बंडखोरी गाजली. माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव असो की, कै. हनुमंतराव बोबडे, माणिकराव आंबेगावकर व तब्बल तीन वेळा विधानसभा गाठणार्‍या हरिभाऊ लहाणे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी,काही नगरसेवक, जिल्हा प्रमुखांनी, शिवसेनेत न्याय मिळूनसुध्दा बंडखोरीच केली.पंरतू या सर्व बंडखोरांचे वैशिष्ट्य म्हणजे एकानेही पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून विधीमंडळ किंवा संसद गाठली नाही.कि त्याचे राजकीय पुनर्जीवन झाले नाही. उलटपक्षी राजकीयदृष्ट्या हे सारे जिल्ह्याच्या राजकारणापासून कोसोदूर फेकल्या गेले. कदाचित याच गोष्टीचा बोध घेऊन या जिल्ह्यात अलीकडे पर्यंत लोकप्रतिनिधी असो पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात कधी बंड केले नाही किंवा वरिष्ठ पातळीवरील बंडखोरीस साथ दिली नाही

 साभार ;- दैनिक दिलासा फेसबूक पेजवरून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या