💥सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥25 ते 30 जुलै ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ आयोजन💥

परभणी (दि.26 जुलै) : देशात सद्यस्थितीत जास्तीत-जास्त विजेचे उत्पादन हे औष्णिक विद्युत केंद्राद्वारेच केले जाते. परंतू वाढती असलेली लोकसंख्या व औद्योगिकीकरणांसाठी दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. कोळसा नैसर्गिक स्त्रोत असल्याने, सौर ऊर्जेपासून विज निर्मिती आणि सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

       स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सवातंर्गत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य पॉवर@2047’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 30 जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती गोयल या बोलत होत्या. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मेघनाताई बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, महापारेषणचे श्रीनिवासन तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याचा देश 75 वा वर्ष साजरे करत आहे. या 75 वर्षात देशाने विविध क्षेत्रात अभुतपूर्व प्रगती केली असून विद्युत क्षेत्रात देखील देश स्वयंपूर्ण झालेला आहे. देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना वीज मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरीता ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ हा कार्यक्रम देशभर 25 ते 30 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असुन याद्वारे विद्युत विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील जास्तीत-जास्त वीजेचे उत्पादन हे कोळशावर करण्यात येते. परंतु कोळसा हे नैसर्गिक स्त्रोत असून यावर जास्त अवलंबून राहता येणार नाही. याकरीता आपल्याला सौर ऊर्जा पर्यायाचा अवलंब करावाच लागणार असुन ती काळाची गरज आहे. सौर ऊर्जा हा कधीही न संपणारा ऊर्जा स्त्रोत आहे, सौर उर्जा हे मानवाला मिळालेले वरदानच आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. भौगोलिक स्थानानुसार देशाला सर्वात जास्त प्रमाणात सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

     आमदार श्री. वरपुडकर म्हणाले की, कोळसा, जल, सौर, गॅस आदीद्वारे विजेचे उत्पादन देशात घेतले जाते. औष्णिक विद्युत केंद्राद्वारे उत्पादीत होणाऱ्या विजेवर वापर शहरी व ग्रामीण भागतील घरांसाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी वापर होतो. परंतू दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे विज निर्मिती सोपी झाली असली, तरी तिच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल हा कधीना कधी संपणार आहे. त्यामुळे निसर्गापासून मोफत मिळणाऱ्या सौर ऊर्जेचा नागरिक आणि शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक आहे. शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या सौर पंपामुळे व सौर पॅनलमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ झालेली दिसून येत असल्याचे ही श्री. वरपुडकर यावेळी म्हणाले.

   आमदार श्री. दुर्राणी म्हणाले की, पुर्वीच्या काळात ग्रामीण भागात वीज पोहचलेली नव्हती, परंतू मागील 20-25 वर्षाच्या कालावधीत महावितरणचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. त्यामुळे प्रत्येक गाव, शहर, वाडे, तांडे प्रकाशमय झाली आहेत. तसेच औद्योगिकीकरणांला देखील मुबलक वीज उपलब्ध होत आहे. वीजेच्या बाबतीत आपला देश स्वंयपूर्ण झाला असुन यामुळे देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येत आहे. यासाठी देशातील विद्युत विभागातील दिवस-रात्र कार्यरत असणारे आपले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय व महत्वपुर्ण आहे. आज प्रत्येक बाबीसाठी वीज आवश्यक असून विज ही जीवनावश्यक भाग बनली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

   जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, देशातील सर्व गुणवत्ता ही वीजेवरच आधारीत आहे. वीज ही दगडी कोळशापासुन निर्मित होत असल्याने भविष्यात कोळशाची कमतरता भासू शकते. याचे भान ठेवून सौर ऊर्जेला गती देवून सौर वापराबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात भावना रुजविणे तसेच याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

      महावितरणचे अधिक्षक अभियंता शांतीलाल चौधरी प्रास्ताविकात म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव अंतर्गत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य-पॉवर @2047’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 30 जुलै या कालावधीत साजरा येत आहे. या कार्यक्रमाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या विविध ‍विद्युत योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात, शेतात ऊर्जाकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करुन योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे.

    यावेळी केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम, सौभाग्य योजना, कुसूम योजना, राज्य शासनाच्या कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे जोडणी, इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आदी योजनांमधून वैयक्तिक अथवा सार्वजनिक सुविधांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपले अनुभव यावेळी सांगितले. तसेच विविध ‍विद्युत योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे यावेळी माहिती सादर करण्यात आली. तसेच कलापथकाद्वारे देखील विविध ‍विद्युत योजनांची यावेळी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालय अधिक्षक अशोक एडके यांनी केले. यावेळी महावितरणचे ग्राहक, विविध योजनेचे लाभार्थी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती......


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या