💥मानवी अस्तित्वाला विसरून नीतिशास्त्राचा अभ्यास अशक्य - डॉ. सुरेंद्र गायधने


💥'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 10 वे पुष्प संपन्न💥

वाशिम ; मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे दहावे पुष्प राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र गायधने यांनी गुंफले. डॉ. गायधने यांनी 2002 या वर्षी नागपुर विद्यापीठातून डॉ. क्रांतिप्रभा पांडे यांच्या मार्गदर्शनात "मूल्य निवेदनाच्या सत्यासत्यतेच्या संदर्भात 'चांगले' या पदाच्या स्वरूपाचे चिकित्सक विवेचन" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 जुलै 2022 या दिवशी त्यांनी ''चांगले या पदाचे स्वरूप'' या विषयावर आपले व्याख्यान दिले.


डॉ. गायधने यांनी आपल्या व्याख्यानातून, चांगले या पदाचा अर्थ स्पष्ट करीत असताना आपल्याकडे Good या इंग्रजी शब्दासाठी रूढ असलेल्या शुभ, इष्ट, चांगले, साधू यासारख्या शब्दांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ह्यूम, हॉब्ज, मूर, रसेल, एयर, हेअर, ऑस्टिन, स्टिव्हन्सन या विचारवंतांनी 'चांगले' या पदाविषयी जे विवेचन केले आहे त्याचा उपस्थितांना परिचय करून देत असताना निसर्गवाद, न-निसर्गवाद नवनिसर्गवाद, आदेशवाद, भावनावाद आणि डॉ. सुरेंद्र गायधने यांनी स्वतः प्रस्थापित केलेला तुलनावाद आशा या निरनिराळ्या सिद्धांताचे स्वरूप विशद केले. 

सर्वसाधारणपणे आपण व्यवहारांमध्ये जे नैतिक असते त्याला चांगले आणि जे अनैतिक असते त्याला वाईट म्हणत असतो. परंतु चांगले म्हणजे काय ? चांगुलपणा हा व्यक्तीवर अवलंबून असतो की वस्तूवर ? चांगलेपणा हा शाश्वत आहे की परिवर्तनीय आहे ? असेही काही प्रश्न उपस्थित होतात. याच संदर्भाने काही विचारवंत कृतीच्या  संदर्भाने  तर काही विचारवंत  भाषीय विश्लेषणाच्या संदर्भाने  चांगले म्हणजे काय ?  याविषयी चर्चा करीत असतात. मात्र आपण ज्या 'चांगले' पदाविषयी किंवा 'नैतिक' पदाविषयी चर्चा करीत आहोत तिचा आधार 'मानवी अस्तित्व' आहे. अर्थात मानवी अस्तित्वाशिवाय आपण चांगले किंवा नैतिक यासारख्या कोणत्याही नीतिशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करू शकत नाहीत किंबहुना ते तसे करने अशक्य आहे. कारण प्रत्येक वस्तूमध्ये काही 'गुणधर्म' असतात आणि त्या गुणधर्माच्या आधारे मनुष्य दोन वस्तूमध्ये तुलना करतो व त्या पैकी एकाला 'चांगले' ठरवतो.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या