💥परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीची सुरुवात....!


💥यावेळी विभागीय वनाधिकारी अरविंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.27 जुलै) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत व  वन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वन महोत्सवानिमित्त आज जिंतूर तालूक्यातील सावंगी म्हाळसा येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मियावाकी पध्दतीने वनक्षेत्र लागवडीची सुरुवात करण्यात आली.


       यावेळी विभागीय वनाधिकारी अरविंद जोशी, तहसिलदार सखाराम मांडवगडे, येलदरीचे सरपंच प्रमोद चव्हाण, वन अधिकारी प्रकाश शिंदे, वन अधिकारी भालचंद्र तळेकर यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे शक्य आहे. वृक्षरोपण किंवा वृक्ष लागवड फक्त उद्दिष्टपूर्ती करिता न करता पर्यावरणांचा समतोल राखण्यासाठी व भविष्यासाठी करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड जेवढी महत्त्वाची, तेवढेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे आहे. आपल्या जिल्ह्यात वन संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या लागवड केलेले झाड, आपल्यासाठी नसते तर पुढील पिढीसाठी उपयोगी असते. यावर्षी जिल्ह्यातील महामार्गाच्या दूतर्फा आणि जिल्‍ह्यात लागवडी करीता उपलब्ध क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नदीच्या दुतर्फा झाडे लावल्यास नदीकाठची गावे, शेती समृद्ध होण्यास मदत होईल, तसेच भूजल पातळीत देखील वाढ होईल. प्रत्येक नागरिकांनी वृक्षाची लागवड करुन त्याचे संवर्धन केल्यास नक्कीच पर्यावरणांचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

      जिंतूर तालूक्यातील मौजे सावंगी म्हाळसा येथील 1 हेक्टरच्या परिसरात वन विभागामार्फत मियावाकी पद्धतीचा उपयोग करून विविध प्रकारच्या विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या परिक्षेत्रात बेल, सत्यपर्णी, निम, अशोका, आपटा, कांचन, पळस, वड, पिंपळ, अर्जुन, आंबा, खैर, कामिनी, कदंब, जांभूळ, आवळा, करंज, रिठा, चिंच, हिरडा, बेहडा, बकुळ आदी सुमारे 20 प्रकारच्या 30 हजार वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या मियावाकी पध्दतीने लागवड केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे.

यावेळी येथील श्री साईबाबा विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या समवेत वृक्ष लागवड केली. तसेच ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष वितरण केले. यावेळी शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या