💥आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर💥
हिंगोली (दि.25 जुलै) : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम-12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणांसह ) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्यासाठी दि 28 जुलै, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव पंचायत समितीसाठी संबंधित तहसील कार्यालयात व वसमत पंचायत समितीसाठी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण निश्चितीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी दिलेल्या वेळेत हजर राहावे.
जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आरक्षणाचे प्रारुप दि. 29 जुलै, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना दि. 29 जुलै ते 02 ऑगस्ट, 2022 या कालावधीत सादर करता येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....
0 टिप्पण्या