💥मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदींशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत💥
परभणी (दि.20 जुलै) : भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयद्वारा लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 तसेच मतदार नोंदणी अधिनियम 1960 यामध्ये 30 डिसेंबर, 2021 पासून सुधारणा केल्या आहेत. यामध्ये मतदारांचा आधार क्रमांक त्याच्या मतदार यादीतील नोंदशी जोडला जाणार आहे. परंतू आधार क्रमांक जोडणे हि बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदींशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत. तसेच मतदार यादी शुद्धीकरणाच्या कामात देखील यामुळे मदत होणार आहे. त्या अनुषंगाने 1 ऑगस्टपासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामधूनही अर्ज क्र. 6 ब गोळा करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या 17 जून, 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार अर्ज क्रमांक 6 ब भरून मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे ऐच्छिकरीत्या जमा करावा. प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहित स्वरूपात व विहित रीतीने मिळविण्यासाठी वैधानिकरीत्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
यासाठी अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO net, GARUDA App, NVSP, VHP या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 6 जानेवारी, 2022 नुसार 14 लाख 76 हजार 821 इतकी जिल्ह्यातील मतदार संख्या असून या मोहिमेमुळे मतदार यादी शुध्द होण्यास मदत होणार आहे. तरी मतदार यादीतील नावाशी 1 ऑगस्ट, 2022 पासून मोठ्या संख्येने मतदारांनी व विविध राजकी पक्षांनी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी निवडणूक निवृत्ती गायकवाड यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या