💥वाशिम जिल्ह्यात ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी : महिला प्रवाश्यांना त्रास....!


💥प्रवासा दरम्यान ट्रॅव्हल्स मध्ये वाजवतात अश्लील गाणी : अतिरिक्त  प्रवासी भाडे घेवुन प्रवासी वर्गाची लुट💥

फुलचंद भगत

वाशिम:- खाजगी ट्रॅव्हल्स चालक मालक कसे मनमानी कारभार करतात, यातून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, याचा प्रत्यय मंगरुळपीर,वाशिम ते पुणे या प्रवासादरम्यान अनेकांना आला आहे.

                 अश्लील गाणे लावून महिलांना त्रास देणे, लघुशंकेसाठी तसेच जेवणासाठी गाडी न थांबवणे, डीक्कीत सामान ठेवण्यासाठी जादा पैसे मागणे, सिगारेट पिऊन गाडीत धूर सोडणे, मोठ्या आवाजात अश्लील गाणी लावणे, प्रेशर हॉर्न देऊन गाडी वेगाने चालवत ओव्हरटेक करणे, प्रवाशांना चुकीच्या ठिकाणी उतरवणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहतूक करणे असा सर्व प्रकार एकाच वेळी घडला असून काही खाजगी ट्रॅव्हलच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला होता.वाशिम रिसोड येथे राहणारे एकजन त्यांची बहीण व लहान भाचा हे ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एका खाजगी ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. रिसोड मध्येच प्रवास सुरू होतानाच गाडीच्या उर्मट कर्मचाऱ्यांनी डीक्कीत सामान ठेवण्यासाठी जादा पैशाची मागणी केली. त्यावर वाद झाल्यानंतर इतर प्रवाशांच्या मध्यस्थीने प्रवासाला सुरुवात झाली.रात्रीचे साडे अकरा वाजले तरी जेवणासाठी गाडी थांबवत नसल्याचे पाहून प्रवाशांनी गाडी थांबवण्याबाबत चालकाला सांगितले. मात्र जेवणासाठी आम्ही गाडी थांबतवत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यावर प्रवाशांची वाद झाल्यावर हॉटेल साई राणा या ठिकाणी गाडी थांबवण्यात आली. मात्र हे हॉटेल जेवणासाठी नसून चहा नाश्तासाठी असल्याचे समजल्यावर प्रवासी संतप्त झाले. त्यानंतर गाडी औरंगाबादकडे निघाली असताना चालकाने गाडीत मोठ्या आवाजाने अश्लील गाणे लावले. त्यावर झोपेत असलेल्या प्रवाशांनी गाणे बंद कर नाहीतर आवाज कमी कर असे सांगितले असता आवाज कमी करणार नाही व गाणी बंद होणार नाही असे उर्मटपणे उत्तर दिले. त्यातच वाहनचालक वारंवार मोठमोठ्याने प्रेशर हॉर्न देत गाडी ओव्हरटेक करीत चालवत असल्याने अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते. त्यातच गाडीतील कर्मचारी गाडीत सिगारेट पीत असल्याने संपूर्ण गाडीत धूर पसरल्याने अनेकांना त्याचा त्रास झाला. महिलांनी लघुशंकेसाठी गाडी थांबविण्यास सांगितले असता त्याने गाडी थांबवण्यात नकार दिला. गाडी पुण्यात आली असता विश्रांतवाडी ऐवजी एका प्रवाशाला शिवाजीनगरला सोडले तर दुसऱ्या प्रवाशाला निगडीला उतरण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडले.एका खाजगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सची ही गाडी नगरला वाहतूक पोलिसांनी पकडली असता त्यांच्याकडे कागदपत्रेही नसतानाही पोलिसांनी त्याची गाडी सोडून दिली. अशी माहिती तक्रारकर्त्या प्रवाशाने दिली. याबाबत आपण परिवहन खात्याकडे तक्रार करणार असून राज्यातील अनेक ट्रॅव्हल्स गाड्या मनमानीपणाने भाडे वसुली करीत असून प्रवाशांना मारहाण करण्याच्या घटना अलीकडे काही ठिकाणी घडल्या आहेत. नुकतेच एका ट्रॅव्हल्स मध्ये काही प्रवाशांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच हा गंभीर प्रकार पुढे आला आहे.काही दिवसापुर्वी गाडीच्या क्लिनरनेच एका महिलेचा विनयभंग केल्याबद्दलही वाशिम जिल्ह्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्यात परिवहन खाते आहे की नाही की यांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही असा एकंदरीत हा प्रकार दिसून येत आहे.सबंधित प्रशासनाने गंभीर दखल घेवुन खाजगी वाहतुकवाल्यांची मनमानी थांबवावी अशी प्रवाशांमधुन मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या