💥अज्ञात आरोपीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल💥
फुलचंद भगत
वाशिम: जिल्हा कारागृहाची सुरक्षा भेदत एका माथेफिरुने चक्क गांजा भरलेला चेंडू कारागृहाच्या आवारात फेकल्याची घटना १६ जून रोजी घडली. कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सदर प्रकार तत्काळ लक्षात आल्याने संबंधितांच्या मनसुब्यावर पाणी फेरले़ या संदर्भात शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़. या घटनेमुळे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील जिल्हा कारागृह परिसरात कडेकोट बंदोबस्त असल्याने परवानगी शिवाय कुणालाही या परिसरात प्रवेश दिल्या जात नाही़. शिवाय कारागृहाच्या चहूबाजूने उंच भिंती उभारलेल्या आहेत़. अशा वेळी कारागृहाच्या सुरक्षेला भेदत एका माथेफिरुने कारागृह परिसरात प्रवेश करुन उंच भिंतीवरुन गांजा भरलेला रबरी चेंडू कारागृहात फेकला. हा प्रकार सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कारागृह कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली़ घटनेचे गांभीर्य ओळखत कारागृह प्रशासनाने शहर पोलिसात रितसर तक्रार दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करुन गांजा भरलेला रबरी चेंडू ताब्यात घेतला. या चेंडूमध्ये १४ ग्रॅम गांजा आढळला असून याप्रकरणी ठाणेदारांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द एमव्हीपीस अॅक्ट २० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वाशिम शहरात गांजा तस्कर सक्रीय असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.....
0 टिप्पण्या