💥शहीद जवान राहुल इंगळे अनंतात विलीन : मध्यरात्री मोठ्या जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...!


💥बाळा रे... वीर मातेचा आक्रोशाने जनसागराला अश्रू अनावर! वडिलांनी दिला मुखाग्नी💥


✍️ मोहन चौकेकर

चिखली  :  मध्यरात्री बाराची वेळ तरीही भारत मातेचा वीर सुपुत्र शहीद जवान राहुलच्या अंत्यसंस्काराला उसळलेला मोठा जनसागर..भारत माता की जय, वंदे मातरम्, वीर जवान अमर रहे च्या गगनभेदी घोषणा.. वीर मातेचा काळजाला चर्र करणारा आक्रोश अन् त्यामुळे उपस्थितांच्या हृदयाला फुटलेला पाझर अशा शोकाकुल पण देशभक्तीचे भारावलेल्या वातावरणात वीर जवान राहुल इंगळे याच्यावर भालगाव येथे मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर  शहीद जवानाचे वडील दत्तात्रय इंगळे यांनी लेकाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 


 भारतीय हवाईदलाचा जवान राहुल दत्तात्रय इंगळे (२४) यांना २१ जून रोजी कर्तव्यावर असताना दिल्ली येथे वीरमरण आले होते. काल, २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पार्थिव भालगाव येथे पोहचणार होते मात्र खराब हवामानामुळे औरंगाबाद विमानतळावर राहुलचे इंगळेचे पार्थिव पोहचण्यास विलंब झाला. विमानतळावर शहीद जवानाला मानवंदना देण्यात आल्यानंतर पार्थिव भालगावसाठी मार्गस्थ झाले. वाटेत जालना, देऊळगावराजा, देऊळगावमही, अंचरवाडी, मेरा चौकी येथेही शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे साडेनऊच्या सुमारास राहुलचे पार्थिव मेहकर फाट्यावर पोहचले. दुपारपासून राहुलच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जमाव मेहकर फाट्यावर जमला होता. मेहकर फाट्यापासून भालगावात पोहचण्यासाठी अर्धा तास लागला. पार्थिव राहुलच्या घरी नेण्यात आल्यानंतर राहुलच्या आईने , बहिणीने व वडिलांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर सजवलेल्या रथातून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री अकराच्या सुमारास पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले.

 त्यानंतर चिखलीच्या आमदार श्र्वेताताई महाले पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर तहसीलदार अजितकुमार येळे, चिखली पोलीस स्टेशन चे ठाणेदार अशोक लांडे, अमडापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, गटविकास अधिकारी श्री सावळे, भालगाव ग्रामपंचायत सरपंच मंगलाताई गणेश परिहार, पोलीस पाटील मिलिंद इंगळे, ग्रामपंचायत सचिव कांचन सरदड, रा. स्व.संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन राठी, वृषालीताई बोंद्रे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, सचिन बोंद्रे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. वीर पिता दत्तात्रय इंगळे, वीर माता सुमनबाई इंगळे, राहुलची बहीण रुपाली यांनीही राहुलच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. 

* माता पित्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द :-

इंडियन एअरफोर्स चे कॅप्टन विनीत पंत यांनी वीर माता पित्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द केला. इंडियन एअर फोर्स व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आकाशात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वीरपित्याने शहीद मुलाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसागर शोकसागरात बुडाला होता.

* शहिद राहुलचे स्मारक उभारणार - आमदार श्वेताताई महाले पाटील 

शहीद जवान राहुलचे जीवन देशासाठी समर्पित होते. त्याचे जीवन तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे भालगाव येथे शहीद जवान राहुलचे स्मारक उभारण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे आमदार श्वेताताई महाले श्रद्धांजली व्यक्त करतांना म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, चिखली नगर संघचालक शरद भाला, डॉ. सत्येंद्र भुसारी, जयश्रीताई शेळके, प्रमिलाताई जाधव, विद्याताई देशमाने, संगीताताई गाडेकर, नंदू कऱ्हाडे, दत्ता सुसर, कृष्णकुमार सपकाळ, वीरेंद्र वानखेडे, अनमोल ढोरे, मनिषाताई सपकाळ यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या