💥अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा विजय💥
✍️ मोहन चौकेकर
मुंबई:-राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत.सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.
* राज्यसभेचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे :-
1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 42
6. धनंजय महाडिक- भाजप - 41
* भाजपचा महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप :-
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात सात तासांपासून निकाल रखडला होता.
* सुहास कांदे यांचे मत बाद :-
दरम्यान, भाजपने केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं. तर यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या मताचे गणित बिघडले.
* केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक :-
भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली. भाजपने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवण्याचा आदेश दिला. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप कुमार पांडे, मुंबईतून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्राची निवडणूक निरीक्षक अजय नायक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली आणि यावर अंतिम निर्णय झाला.....
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या