💥नांदेड येथील वर्तमान सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यकाळातील गैरप्रकाराच्या चौकशीचे राज्य शासनाने दिले आदेश....!


💥अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठीत💥

नांदेड (दि.२४ जुन २०२२) - वर्तमान गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यकाळात बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केलेल्या कामातील अनियमितता आणि गैरप्रकार यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी ही कारवाई केली.

   सध्या कार्यरत असलेल्या गुरुद्वारा बोर्डाचे  अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मन्हास हे स्थानिक रहिवासी नाहीत. ते एक उद्योजक असून त्यांच्या कारभाराचा व्याप प्रचंड आहे. त्यांचे स्वास्थ्यही ठीक नसते. त्यातच  करोनाची आपत्ती! या सर्व पार्श्वभूमीवर बोर्डाचे गठन झाल्यापासून, एक दोन वेळेस सोडता ते स्वतः नांदेडला आलेच नाहीत. बोर्डाचे उपाध्यक्ष स. गुरविंदर सिंग बावा हे देखील मुंबई येथील रहिवासी असून तेही एक व्यवसायिक आहेत.त्यामुळे नांदेड येथे त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ही नगण्यच राहिली. त्यामुळे नियमानुसार घ्यावयाच्या बोर्डाच्या विविध बैठका  आणि अर्थसंकल्पीय बैठका झाल्याच नाहीत. या पार्श्वभूमीवर नांदेड येथील अन्य पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निर्देशानुसार, जो काही गुरुद्वारा बोर्डाच्या कारभाराचा गाडा हाकला तोच नियमबाह्य आणि गैरप्रकार यांना उत्तेजन देणारा असल्याचा आरोप वेळोवेळी स्थानिक जनतेतून होत राहिला. गत तीन वर्षात पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाच्या केलेल्या दुरुपयोगयामुळे आणि मनमानी कारभारामुळे, गुरुद्वारा बोर्डाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पीय बैठका   झाल्या नसल्याने,बोर्डाचे आर्थिक व्यवहार करण्यात अनेक अडचणी आल्या.या कार्यकाळात गुरुद्वारा आणि परिसराच्या विकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यात यश आलेले नाही. उलटपक्षी गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांचे अगत्याचे प्रश्न विनाकारण प्रलंबित होत गेले. या विषयी सामान्य जनतेने वेळोवेळी संबंधितांना निवेदने देऊन तक्रारी केल्या. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नव्हती.

     राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य  कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक युवा कार्यकर्ते स. स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी पुढाकार घेत, ते स्वतः अध्यक्ष असलेल्या बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या व स्थानिक शिख समाजाच्या माध्यमातून, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली होती. या उपोषणास समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा वाढत गेला. स्वतः पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी घेतली होती. त्यामुळेच शासन दरबारी पाठपुरावा होऊन, चौकशी समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले.

 याप्रकरणी गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकारी आणि सदस्यांची काय भूमिका आहे?  खरंच या गत तीन वर्षात काही अनियमितता झाल्यात का? याचे चित्र चौकशी समितीच्या निष्कर्षा नंतरच स्पष्ट होईल.या समितीत सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी ( सा.प्र.),कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), लेखा वा वित्त अधिकारी (जि.प.नांदेड) यांचा समावेश करण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या