💥रविकांत तुपकरांना लोकरथ प्रदान ; प्रेम,त्याग अन् विश्वासाचा प्रतिक ठरला कृतज्ञता सोहळा....!

                                 


              

💥भरगच्च गर्दीत पार पडला अविस्मरणीय कृतज्ञता सोहळा💥



बुलडाणा :- रविवारची बुलडाण्यातील सायंकाळ अविस्मरणीय आणि सुवर्ण अक्षरांनी नोंद करावी अशीच ठरली. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांसाठी गेल्या दोन दशकांपासून आपल्या जिवाची पर्वा न करता निधड्या छातीने प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देणाऱ्या शेतकरी योद्ध्याचा , महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ म्हणुन ओळखले जात असलेल्या शेतकरी नेत्यांचा कृतज्ञता सोहळा हा प्रेम, त्याग अन् विश्वासाचे प्रतिक ठरला. विविध क्षेत्रातील मान्यवर, हजारो चाहते, शेतकरी अन् मायमाऊंच्या साक्षीने रविकांत तुपकर या लोकनेत्याला लोकांनी लोकवर्गणीतून साकारलेला लोकरथ प्रदान करण्यात आला. डोळ्यात साठवून ठेवावा असा हा क्षण डोळ्यात पाणी आणणाराही ठरला, हे विशेष.


     रविवार, १२ जून रोजी बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी येथे सायंकाळी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे कार्यक्रम हॉलमध्ये स्थलांतरीत करावा लागला मात्र जेवढे लोक हॉलमध्ये होते, त्यापेक्षा दुप्पट लोक हॉलच्या बाहेर उभे असल्याने पुन्हा कार्यक्रम बाहेर हिरव्यागार लॉनवर करावा लागला, या तयारीत तास, दीडतास उशीराने कार्यक्रम सुरु झाला. परंतु उपस्थितांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच होती. हिमांशु बक्क्षी यांच्या कर्णमधूर बासरीवादनाने या सोहळ्याची सुरुवात झाली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी,ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ होते तर पद्मश्री पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे सचिव ओमप्रकाश शेटे, प्रसिद्ध लेखक, निवेदक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाच्या सरतेशेवटी माजीमंत्री महोदवराव जानकर यांनीही या कार्यक्रमात आकस्मीक हजेरी लावत आश्चर्याचा धक्का दिला. काळ्यामातीचे पूजन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पत्रकार व निवेदक असलेले राजेंद्र काळे यांनी प्रास्ताविकातून या संपूर्ण सोहळ्याची पार्श्वभूमी विषद केली. प्रसिद्ध लेखक, निवेदक संदीप काळे यांनी माती अन् बैलजोडी पूजनाने प्रारंभ होणारा हा राज्यातील एकमेक सोहळा असल्याचे सांगितले. रविकांत तुपकर हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. हा सोहळा बुलडाण्याच्या इतिहासात कधीच विसरला जाणार नाही. येणाऱ्या पिढीसाठी रविकांत तुपकर हे आदर्श ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे यांनी रविकांत तुपकरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकसंग्रह, चाहत्यांचे प्रेम, दांडगा जनसंपर्क ही रविकांत तुपकरांची संपत्ती आहे, खुप कमी लोकांच्या आयुष्यात अशी संपत्ती मिळते. कुबेराच्या संपत्तीपेक्षाही रविकांत तुपकरांनी जमविलेली हक्काची, आपुलकीच्या माणसांची संपत्ती मोठी आहे आणि ही संपत्ती अशीच अगणित वाढत राहील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. आज  सर्वांनी गाडी दिली आता या गाडीवर लाल दिवा लावल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.

     बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी १९७६ मध्ये जनसंघाचे अर्जूनराव वानखडे यांना लोकांनी गाडी घेऊन दिली होती, त्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात हा भव्यसोहळा होत आहे. रविकांत तुपकरांचे काम किती मोठे आहे हे यातून दिसून येते असे सांगत आजपासून एका राजकीय पर्वाला सुरुवात झाली असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. पण पद्मश्री पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या रविकांत तुपकरांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पाणी आणि माती दुषीत होत असल्याचे सांगून यासाठी काम करण्याचेही आवाहन त्यांनी केले. सत्यपाल महाराजांनी आपल्या खास शैलीत समाजातील भ्रष्टाचारी वृत्तीवर प्रहार केला. कमिशन, टक्केवारी लोकप्रतिनिधींची गडगंज संपत्ती याबाबतही त्यांनी टिका केली. रविकांत तुपकर सारख्या सच्चा कार्यकर्ता समाजाने जपला पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांना राज्यभर फिरण्यासाठी गाडी दिली आता जनसामान्यांच्या हितास्तव लढण्यासाठी त्यांना आमदार किंवा खासदार बनवा असे आवाहन देखील त्यांनी केले. माजी मंत्री महादेव जानकर यांनी रविकांत तुपकरांच्या कार्याला बळ देण्यासाठी आल्याचे सांगून रविकांत तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. या अविस्मरणीय सोहळ्याच बहारदार सूत्रसंचालन अहमदनगर येथील विनाताई दिघे यांनी केले तर संदीप चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मंचावर प्रभूकाका बाहेकर,संदिपपाल महराजांची उपस्थिती होती. या सोहळ्याला रविकांत तुपकर मित्र परिवार, कार्यकर्ते, शेतकरी,  युवक आणि महिलांची भरगच्च उपस्थिती होती.

* या ऋृणातून मुक्त होऊ शकत नाही : रविकांत तुपकर

सर्वांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास पाहून मन भरुन आले आहे. ही जबाबदारी आता पेलावी तरी कशी? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सर्वांच्या या ऋृणातून मुक्त होणे शक्य नाही, अशा भावना रविकांत तुपकरांनी या वेळी व्यक्त केल्या. आपले कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करतांना त्यांना गहिवरुन आले होते. लोकवर्गणीतून मिळालेले हे वाहन हे शेतकरी चळवळ आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी लढण्यास बळ देणारे आहे. आजच्या सोहळ्यापेक्षा मोठा पुरस्कार, मोठा सन्मान कुठलाच असू शकणार नाही, माझ्यावर उधळलेल्या प्रत्येक पाकळीचा अवमान होऊ होऊ देणार नाही, यापुढे जगणार आणि मरणारही शेतकरी आणि निस्वार्थ कार्यकर्ते अन् चाहत्यांसाठीच, त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

* रविकांत तुपकर हे समाजाचे वैभव : विठ्ठल वाघ

शेतकऱ्यांनी, मित्रपरिवाराने लाखो रुपये जमा करुन उभे केलेले हे वाहन नसून लाखो हातांचा आशिर्वाद आहे. जमविलेले लाखो चाहते आणि हा लोकसंग्रह म्हणजे रविकांत तुपकरांची संपत्ती आहे तर रविकांत तुपकर हे समाजाचे वैभव आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध कवि विठ्ठल वाघ यांनी रविकांत तुपकरांच्या कार्याचे कौतुक केले. लोकवर्गणीतून मिळालेल्या वाहनामुळे रविकांत तुपकर यांची चळवळ आणखी गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रविकांत तुपकर यांच्यावर लिहिलेली कविता त्यांनी सादर केली.

*....अन् अश्रुंचा बांध फुटला :-

कोणतेही पूजन हे सुवासनीच्या हस्ते होते परंतु अंधश्रद्धेला मुठमाठी देत या नव्याकोऱ्या लोकरथाचे पूजन स्व. राणा चंदन यांच्या विधवा पत्नीच्या हस्ते करुन रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्याविषयी असलेले प्रेम प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केले. वाहनप्रदान सोहळ्याच्या वेळी रविकांत तुपकरांसह त्यांच्या धर्मपत्नी ॲड. शर्वरी तुपकर या दोघांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. हा भावनिक क्षण पाहून रविकांत तुपकरांचे चाहते, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांच्याही अश्रुचा बांध फुटला होता.

* आत्यम्ह्त्याग्रस्त  शेतकरी कुटुंबांना मदत :-

या सोहळ्याची सुरुवात ही माती अन् बैलपूजनाने झाली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात सहा भगिनींना मान्यवरांच्या हस्ते मदत सुपूर्द करण्यात आली. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्याद्वारे पंधरा दिवसाचे बालसंस्कार शिबिर चालविले जाते या शिबिर सहभागी होणाऱ्या मुलांच्या भोजनासाठीही रविकांत तुपकर यांनी मदतनिधी देत सामाजिक बांधिलकी जोपासली.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या