💥महाराष्ट्र राज्यात सेनेची फरफट,राष्ट्रवादीची अगतिकता.....!


💥सत्ता टिकविणे हे शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीसाठी अनिवार्य झाले आहे म्हणून स्वतःशरद पवार मैदानात💥


राष्ट्रवादी काँग्रेस आज उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.. याचं कारण उध्दव ठाकरे यांची पाठराखण करणं ही  शरद पवार यांची  आजची मजबुरी आहे.. त्यांनी तसं केलं नाही तर सत्ता हातची जातेय .. तसं घडणं राष्ट्रवादीला परवडणारं नाही.. कारण एकदा सत्ता भाजपच्या हाती गेली तर मग किमान पुढील अडीच वर्षे सत्तेवर जाण्याचे राष्ट्रवादीचे सर्व मार्ग बंद होतात.. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद आणि महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.. तिथं पक्षाला मोठा फटका बसू शकतो.. शिवाय इडीची साडेसाती हात धुवून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे लागेल ते वेगळंच.. त्यामुळे सत्ता टिकविणे हे शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीसाठी अनिवार्य झाले आहे म्हणून स्वतःशरद पवार मैदानात उतरलेले आहेत.


शिवसेनेचे काही आमदार घेऊन एकनाथ शिंदे सुरतला गेले.. तेव्हा सेनेचे किती आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत हे माहिती नव्हतं..बातम्या येत होत्या, एकनाथ शिंदे बरोबर १३ आमदार आहेत म्हणून.. अनेकांप्माणे तेव्हा शरद पवार यांनाही वाटलं की,.. सेनेचा तुकडा पडला पण फार मोठा नाही... म्हणूनच शरद पवार यांनी तेव्हा हा सेनेचा अंतर्गत मामला असल्याचे सांगून हात झटकले होते..  त्यांची पहिली प्रतिक्रिया संकट किती गहिरे आहे याचा त्यांना अंदाज आलेला नसल्याने होती.. सेनेतून फक्त १३ आमदार बाहेर पडले तर शिवसेना फुटते पण सरकार पडत नाही असं पवार गृहित धरून होते.. असं झालं तर  आमदार आमच्यापेक्षा कमी झाल्याचे सांगून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगता येऊ शकेल असा पवारांचा होरा असावा. .. मात्र, विषय आपण समजतो त्यापेक्षा जास्त गंभीर आहे हे जेव्हा पवारांना समजून आले तेव्हा शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली..  आलेले संकट केवळ शिवसेनेवरचे नव्हते तर थेट सरकारवरचे होते.. सरकार टिकविणे ही पवारांच्या प्राथमिकता होती, त्यादृष्टीने मग ते कामाला लागले.. "सरकार वाचवा" "मोहिम शरद पवार फत्ते करतात की, नाही हे आज उद्या कळेल..

राष्ट्रवादी आज शिवसेनेच्या बरोबर दिसत असली तरी शिवसेनेबद्दल आज भाजपला जेवढा आकस आहे तेवढाच राष्ट्रवादीला देखील आहे.. शिवसेना जेवढी विकलांग होईल तेवढा लाभ राष्ट्रवादी आणि भाजपला होणार आहे.. शिवसेना खिळखिळी झाली तर शिवसेनेला मिळणारी हिंदुंची मतं आपल्याकडे ट्रान्सफर होतील असं भाजपला कायम वाटत आलंय.. त्यामुळे युतीत असताना आणि नंतरही भाजपने सातत्यानं शिवसेनेच्या मानगुटीवर बसून सेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला...नेत्यांना अपमानीत केलं.. युती तुटणयाचं ते एक कारण होतं.. 

राष्ट्रवादीचे गणित वेगळे होते.. ग्रामीण महाराष्ट्रात भाजप हा राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी नाही.. शिवसेना आहे.. ग्रामीण भागातील अनेक मतदार संघात सेनेची निर्णायक मतं आहेत.. शिवसेना खिळखिळी झाली तर ग्रामीण भागात आपल्याला मोठा प्रतिस्पर्धी उरणार नाही आणि आपली आमदार संख्या नक्की वाढेल हे शरद पवार यांचे गणित होते.. त्यामुळे संजय राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेला भाजपपासून वेगळे केले.. उध्दव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असा डाव टाकला.. या सापळ्यात उध्दव ठाकरे अडकले.. खरं तर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची सूत्रं एकनाथ शिंदे यांच्या हाती द्यायची होती.. ते पवारांनी होऊ दिले नाही.. याचे परिणाम आज सेनेला भोगावे लागत आहेत.. "उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेऊ नये, पक्षावरील पकड आणि मातोश्रीचा दबदबा कायम ठेवावा" "असा लेख मी तेव्हा लिहिला होता.. तसे झाले नाही.. सरकारची जबाबदारी, आजारपण, आमदारांना गृहित धरण्याची चूक, आणि सभोवताली दरबारी राजकारण करणारांचं कोंडाळं यामुळं पक्षांशी आणि आमदारांशी असलेला उध्दव ठाकरेंचा संपर्क पूर्णतः तुटला.. परिणामतः पक्षात एवढा मोठा कट शिजतोय हे शेवटपर्यंत त्यांना समजू शकले नाही..त्याचा मोठा फटका पक्षाला, उध्दव ठाकरे यांना बसणे अटळ होते.. तो बसला.. सावरायला देखील वेळ मिळाला नाही..आता वेळ निघून गेलीय..सरकार तर जातेच आहे, पक्षही हातात राहतो की, नाही याची चिंता आहे.. 

शिवसेनेची झालेली वाताहत भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे तशीच ती राष्ट्रवादीची कोंडी करणारी ही आहे.. या अवस्थेतून बाहेर पडायला शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा वेळ लागणार आहे.. हे दोन्ही पक्ष अडचणीत आलेले असले तरी  निवडणुकीत ते हातात हात घालून चालूही शकत नाहीत.. कारण शिवसेना - राष्ट्रवादी आघाडी बहुतेक आमदारांना जशी मान्य नाही तशीच ती आजही जी मंडळी उध्दव ठाकरे यांच्या बाजुने आहेत त्यांच्यातील अनेकांना  मान्य नाही.. कारण तळागाळातील सेनेच्या कार्यकर्त्यांचा रोज सामना राष्ट्रवादीशी आहे.. अशा स्थितीत किमान उघडपणे तरी निवडणुकीत राष्ट्रवादी - सेना आघाडी होणार नाही.. झालीच तर सेना उरणार नाही.. अशा स्थितीत आजच्या पडझडीतून सेनेला बाहेर पडायचे असेल तर नव्याने "एकला चलो रे" भूमिका घ्यावी लागेल.. ती अवघड असली तरी दुसरा मार्ग सेनेजवळ नाही.. अशक्य वाटणारा एक पर्याय जरूर आहे मनसेबरोबर युती करण्याचा... पण दोन्ही बाजुचे हितसंबंधी तो यशस्वी होऊ देणार नाहीत..दोन्ही ठाकरेंचे इगो देखील तेवढेच मोठे आहेत..

मी शिवसैनिक नाही.शिवसेना पक्षाशी माझा थेट संबंधही नाही.. तरीही मनापासून असे वाटते की, एक दबावगट म्हणून देशात जशी कॉंग्रेस  असली पाहिजे तव्दतच महाराष्ट्रात शिवसेना टिकली पाहिजे... सेना संपणे किंवा विकलांग होणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही..हे नक्की.. 


*एस.एम देशमुख*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या