💥शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या ३८ आमदारांनी काढला ठाकरे सरकारचा पाठींबा....!


💥शिंदेंना आज तब्बल ५० आमदारांचे समर्थन आहे.यात शिवसेनेचे ४१ तर अपक्ष ९ आमदारांचा समावेश आहे💥 

✍️ मोहन चौकेकर

एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत समर्थकांचा गट घेऊन सूरतला रवाना झाले. तेथून ते गुवाहाटीकडे गेले. आधी १५-१६ आमदार सोबत असलेल्या शिंदेंना आज तब्बल ५० आमदारांचे समर्थन आहे.यात शिवसेनेचे ४१ तर अपक्ष ९ आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी लागलीच कायदेशीर लढाई सुरू झाली. यात शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना अपात्रतेच्या नोटीसा मिळाल्या असून यावर आज दिनांक २७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. याच्या विरोधात संबंधीत आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

तर, दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यांना गटनेते पदावरुन बाजूला सारून हे पद अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्यातर्फे हरीश साळवे तर शिवसेनेतर्फे कपील सिब्बल यांनी बाजू मांडली. यासोबत दोन्ही गटांतर्फे अनुक्रमे मुकुल रोहतगी आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांना सहकार्य केले.

यातील एकनाथ शिंदे यांनी आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे आता मविआ सरकार अल्पमतात आल्याचा दावा सरकारने केला आहे. या याचिकेवर लवकरच कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जरी आपल्या सहकार्‍यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असल्याचा दावा केला असला तरी याबाबत प्रत्यक्ष सभागृहातील शक्ती परिक्षणातच मविआ सरकार अल्पमतात आले की नाही ? हे कळणार आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या