💥नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाशी संबंधित विविध प्रश्नांची करणार सोडवणूक...!


💥येत्या २० तारखे नंतर राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांशी शिष्टमंडळासह करणार चर्चा - ना.अशोक चव्हाण

नांदेड (दि.२३ जुन २०२२) - नांदेड गुरुद्वारा बोर्डाशी संबंधित विविध प्रश्नांवर, शीख बांधवांची मते जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी, येत्या 20 जून नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी उपोषण कर्त्या शिष्टमंडळासह आपण चर्चा करू असे आश्वासन ना. अशोकरावजी चव्हाण यांनी दिले आहे. उपोषणकर्त्या शीख बांधवांनी नुकतीच पालकमंत्र्यांची भेट घेतली, त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले.या शिष्टमंडळात स.मनबीरसिंघ ग्रंथी , स.जसपालसिंघ लांगरी, बंदिछोडसिंघ खालसा, सुखविंदरसिंघ हुंदल, स.प्रेमजीतसिंघ शिलेदार यांच्यासह यांचा समावेश होता.


सध्याच्या कार्यरत असलेल्या गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्याने, बोर्ड त्वरीत बरखास्त करून निवडणूक घेण्यात यावी. भाजपा शासनाने केलेल्या कायद्यातील कलम अकराचे संशोधन रद्द करावे. वर्तमान गुरुद्वारा बोर्डाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी. नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डासाठी तीन सदस्यांना ऐवजी अकरा सदस्यांची निवडणूक घेण्यात यावी.या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी गत काही काळापासून शीख समाज आग्रही आहे. पण या मागण्यांची शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नव्हती.त्यामुळे नांदेड येथील स्थानिक शिख संगत व धडाडीचे युवा कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स.मनबीरसिंघ  ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी, ते स्वतः अध्यक्ष असलेल्या बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात केली होती. या साखळी उपोषणास शीख समाजातून वाढता पाठिंबा मिळत होता. विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रवींद्रसिंग मोदी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते यांच्यासह काँग्रेसचे आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला होता. त्यानंतर नांदेड दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेतल्यानंतर, याविषयी आपण ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी समक्ष चर्चा  करण्याचा लवकरच प्रयत्न करू असे ना.चव्हाण यांनी  शिष्टमंडळास आश्वासित करून उपोषणाची सांगता केली होती. पण त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आणि आता विधान परिषदेची निवडणूक यामुळे

 ही भेट  लांबणीवर पडली. पण आता पालकमंत्र्यांनीच आश्वासन  दिल्यामुळे, लवकरात लवकर हे प्रश्न निकाली निघतील अशी आशा निर्माण झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या