💥बारोमास : काळीज शहारुन गेलेला हाऊसफुल नाट्यप्रयोग...,!


💥वैश्वीक कृषीमुल्य जाणीवा जागविणारे बारोमास - ना.राजेंद्र शिंगणे

‘काय फायदा रडून- जीणं हसत जगावं..अन् मातीच्या कुशीत, सोनं होवून उगावं..’

✍️राजेंद्र काळे

असा अमूल्य संदेश बळीराजाला देणाऱ्या प्रा.डॉ. सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ कादंबरी केवळ ग्रामीण जीवनाची चित्रण करणारीच नसून, वैश्वीक कृषीमुल्य जाणीव जागविणारी साहित्यकृती असल्याचे प्रतिपादन ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले. निमित्त होते, हृदय पिळवटून टाकणाऱ्या ‘बारोमास’ या नाट्य प्रयोगाचे.. हाऊसफुल झालेल्या ‘बारोमास’ नाटकाने गर्दे हॉलमधील गर्दीचे अक्षरश: शहारुन गेले काळीज!

‘बारोमास’ प्रा.सदानंद देशमुख यांची साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी. तब्बल २२ भाषां-मधून अनुवादीत झालेली अन् इंग्रजीच्या माध्यमातून वैश्वीक साहित्य मंचावर पोहचलेली. या कादंबरीवर हिंदी चित्रपटानंतर दिशा थिएटर्स, सरस्वती प्रॉडक्शन व प्रल्हाद आर्ट निर्मित ठाणे आर्ट गिल्डच्या माध्यमातून दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी ‘बारोमास’ हे नाटक रंगमंचावर आणले. ‘झी नाट्यगौरव’ व ‘मटा सन्मान’ सह ९ नामांकन व ६ पुरस्कार या नाटकाला मिळालेत. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे ते बेळगावपर्यंत हे नाटक गाजत असतांना, ‘बारोमास’ कलाकृती ज्या मातीतून प्रसवली, त्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यात या नाटकाचा प्रयोग ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विशेष पुढाकारातून रविवार ५ जून रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला होता, यावेळी रंगमंचावर कादंबरीकार प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांचा विशेष सत्कार ‘टीम बारोमास, बुलडाणा’ व  ‘आम्ही शब्दप्रेमी'तर्फे आयोजीत करण्यात आला होता. रसीक प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रा.सदानंद देशमुख व सौ.वनिता देशमुख या दाम्पत्याचा सत्कार होत असतांना उस्फुर्त दाद दिली. यावेळी मंत्रालयीन सचिव सिध्दार्थ खरात, रविकांत तुपकर, राहुल बोंद्रे व संतोष वेरुळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नाट्यप्रयोग सुरु होण्याआधी झालेल्या या रंगतदार सत्कार सोहळ्यात प्रा.डॉ.सदानंद देशमुख भारावून गेले होते, आतापर्यंत अनेक ठिकाणी सत्कार झालेत.. पण आपल्या मातीत आपल्या माणसांनी केलेला सत्कार माझ्यासाठी हृदयास्पर्शी असून, ‘बारोमास’चा नाट्य प्रयोग बुलडाण्यात होत असल्याबद्दल त्यांनी कृत्यकृत्य होवून धन्यता व्यक्त केली.

सिध्दार्थ खरात यांनी ‘बारोमास’मधील प्रत्यक पात्र प्रत्येकाशी जवळीक साधणारे असल्याचे सांगत ग्रामीण कृषीचित्रण प्रा.सदानंद देशमुख यांनी ज्या ताकदीने उभे केले आहे, त्याला साहित्यविश्वात तोड नसल्याचे सांगितले. नाटकाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या राजेंद्र काळे यांनी ‘बारोमास’ नाटक बुलडाण्यात आणण्यामागची भूमिका विषद करुन साहित्य व सांस्कृतिक चळवळीच्या पाठीशी पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे ठामपणे उभे राहत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ.गजेंद्र निकम व डॉ. सौ. वैशाली निकम यांनी ‘बारोमासकार’ प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांची महती त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत गुंफून वेगळ्या पध्दतीने सादर करुन रसिकांचा ठाव घेतला. मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांनी केले, तर संचालन डॉ.कु.गायत्री सावजी हिने भारदस्त नाट्यमय पध्दतीने सादर केले.

यावेळी डॉ.गणेश गायकवाड, अरुण जैन, शाहीना पठाण, वैशाली तायडे, सुधाकर मानवतकर, प्रशांत सोनुने, कु.गार्गी हर्षवर्धन सपकाळ, प्रशांत सोनुने, रविकिरण टाकळकर, मंजुश्री राजे जाधव, रविंद्र साळवे, जयंत दलाल, अरुण दिवटे, जयसिंगराजे जाधव, बबन लोणकर यासह शेकडो ‘बारोमास’प्रेमींनी अथक परिश्रम घेतले.

▪️ नाट्यप्रयोगाने भारावले रसिक :-

हळूवारपणे दार उघडून एकनाथची एन्ट्री रंगमंचावर होताच टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी दिलेली सलामी, प्रत्येक पात्राच्या एन्ट्रीला मिळणारी दाद, संवादपेकीला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद, प्रकाश योजनेसाठी तेजोमय साद, अलकाची घालमेल, शेवंताचा ठसका, झिंगाट पटवाऱ्याचं सैराट अर्थज्ञान, बेफिकीर मधू अन् अवखळ खंड्या.. सासर सांजोळ पासून ते माहेर मोहाडीपर्यंत सरकत जाणारं कथानक, मध्येच न कळू देता येणारा फ्लॅशबॅक. अल्लड, प्रेम अन् भीषण वास्तव, सोन्याची हाव अन् धोंडीसाठी एकवटलेला गाव, शेतीची दशा अन् शेती हीच दिशा.. असं मार्गाक्रमण करत पुन्हा एकनाथनं हळूवारपणे उघडलेलं दार.. सुरु होणारं नाटक २ अंकाचा प्रवास करुन संपत, तेंव्हा विचार करुन आलेला प्रेक्षक विचार घेवूनच बाहेर पडतो.

सारंच सुरेख.. नेपथ्य, वेषभुषा, रंगभुषा, रंगमंच सजावट, प्रकाश, ध्वनी, सादरीकरण अन् दिग्दर्शनही.. ही अनुभूती आली बुलडाणेकरांना.. निमित्त होतं, नाटक ‘बारोमास’!   

✍️ राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या