🔹गौतम नगरात सिलींडर, शेगडीचे वाटप🔹
गंगाखेड : गगनाला भिडलेल्या गॅसच्या किमतींमुळे मध्यमवर्गीयांना सुद्धा गॅस विकत घेणे अवघड झाले आहे. मग तो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना कसा परवडेल ? असा सवाल ऊपस्थित करत उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर मोफत गॅस पुरवठा करावा, अशी अपेक्षा आज गंगाखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली.
गंगाखेड शहरातील गौतम नगरात माजी नगरसेवक प्रमोद मस्के यांच्या पुढाकारातून आयोजित उज्वला गॅस वाटप कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनुस होते. तर समता परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष संजय सोनटक्के, अक्षय गॅस एजन्सीचे व्यवस्थापक नंदकुमार नखत, श्री निलंगे, श्री चव्हाण, माजी नगरसेविका सौ मनीषा प्रमोद मस्के, सुभाष भालेराव, शेख पाशाभाई, शेख अल्लाबक्ष, अशोक कांबळे, आदिंची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना गोविंद यादव यांना सौ. मनिषा व प्रमोद मस्के यांच्या कार्याचे कौतुक केले. निवडणूकीच्या तोंडावर काही संभाव्य ऊमेदवार स्वार्थापोटी पक्ष बदलत आहेत. निवडणूकीत आपल्यासाठी पेसै खर्च करणारा नेता शोधत आहेत. या परिस्थितीत प्रमोद मात्र गोरगरीबांची कामे करून त्यांचे आशिर्वाद जमा करत आहेत. हेच आशिर्वाद मस्के यांना पुन्हा सभागृहात पाठवतील, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
गॅसचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय पुन्हा चुल-शेगड्यांकडे वळत आहेत. या परिस्थितीत ऊज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस पुरवठा मिळवलेल्या गरीब जनतेला हजार रूपयांच्या पुढे गेलेला गॅस विकत घेणे अशक्य आहे. या योजनेला पुर्णतः यशस्वी करावयाचे असेल तर शे-दोनशे रूपये अनुदान न देता योजनेतील लाभर्थ्यांना संपुर्णतः मोफत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली. यासाठी केंद्र कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री यादव यांनी दिली.
संयोजक प्रमोद मस्के यांनी त्यांनी केलेल्या विविध कामांची माहिती देवून जनतेने काम करणारांनाच पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, गॅस एजन्सीचे श्री चव्हाण यांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख रोफ भाई, चव्हाण, टोम्पे भाऊ, अब्दुल भाई, आकाश साळवे, शेख गफार, दिपक डाके, नरेंद्र मस्के आदिंनी परीश्रम घेतले.....
0 टिप्पण्या