💥गंगाखेड येथील वारकरी मोर्चा प्रकरणातील आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता...!


🔹खा.संजय जाधव,आ.डॉ.रत्नाकर गुट्टे,काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव,कदम यांचेसह बारा जणांची निर्दोष मुक्तता🔹

गंगाखेड : येथे काढण्यात आलेल्या वारकरी मोर्चा प्रकरणी विविध पक्षीय पदाधिकारी, वारकऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदरील प्रकरणी आज अंतीम सुनावणी झाली. यात परभणीचे खासदार संजय जाधव, आ. रत्नाकर गुट्टे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, मनसे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, बालासाहेब निरस, मनोहर केंद्रे यांच्यासह बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

गंगाखेड येथील संत मारोतराव महाराज वारकरी संस्थेत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात ह.भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन सुरू असताना गंगाखेडचे तत्कालीन पोलीस निराक्षक सोहम माछरे यांनी ते बंद पाडले. तसेच ऊपस्थित वारकऱ्यांना ऊद्धटपणाची वागणूक दिली. या प्रकाराच्या निषेधार्थ गंगाखेड परिसरातील हजारो वारकऱ्यांच्या ऊपस्थितीत गंगाखेड तहसीलवर दि. २१ जानेवारी २०१९ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. 

या मोर्चा दरम्यान झालेली घोषणाबाजी आणि भाषणांमधून पोलीसांची प्रतिमा मलीन करण्यात येवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे ऊल्लंघण करण्यात आल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्या मार्फत देण्यात आली होती. यावरून मनोहर गंगाराम केंद्रे, रोहीदास मस्के, सुर्यभान आवलगावकर, डॉ. सुभाष कदम, बालासाहेब निरस, गोविंद यादव, वसंत चोरघडे, बालाजी मुंडे, दिलीप जोशी, विशाल कदम, संजय जाधव, रत्नाकर गुट्टे यांचे सह ईतर २५० ते ३०० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. स. पो. नि. सुरेश थोरात यांनी अधिक तपास करून २६ एप्रिल २०१९ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. 

या प्रकरणाची सुनावणी होवून न्या. डी.जी. गुट्टे यांनी वरील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींची बाजू ॲड रावसाहेब वडकीले, ॲड काकाणी, ॲड क्षीरसागर यांनी मांडली. तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड.फड यांनी काम पाहिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या