💥डॉ.दिपाली कांबळे यांना शासनाचा " गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार " जाहीर....!


💥पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त,पशुधन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात आला पुरस्कार💥

परभणी - शासकीय सेवेत दमदार, उल्लेखनीय कामगिरी कामगिरी बजावत असल्याबद्दल मानवत येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामधील श्रेणी- १ पशुधन विकास अधिकारी, डॉ.दिपाली कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा " गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार " जाहीर झाला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त, पशुधन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या कडून दिला जाणारा हा पुरस्कार डॉ.दिपाली कांबळे यांना त्यांच्या दमदार कामगिरी मुळे प्राप्त झाला आहे सदरील पुरस्कार, पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनी २० मे २०२२ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य सोहळ्यात डॉ.दिपाली कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  डॉ.दीपाली कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत, अत्यंत हालाखीत शिक्षण घेवून, बिकट संकटांवर मात करीत,"पशुधन विकास अधिकारी "पदापर्यंत चा पल्ला गाठलेला आहे.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबाची वाताहत झाली, कुटुंबाची आर्थिक घडी बिघडली असतानाही खंबीरपणे स्वतःला सावरून, जिद्दीने शिक्षण पुर्ण केले व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१३ साली यशस्वी होवुन "पशुधन विकास अधिकारी "पदीं निवड झाली.त्यांची पहिली नियुक्ती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागाच्या कळवण तालुक्यात झाली, तेथे ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्यामुळे, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी ची शासनाने दखल घेऊन " गुणवंत पशुवैद्यक पुरस्कारासाठी"त्यांची निवड केली आहे.

प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास निश्चितपणे त्या कार्याची दखल घेतली जाते, मला जाहिर झालेल्या पुरस्काराने हुरळून न जाता,आपले कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवणार आहे. मी,म.ज्योतिबा फुले,छ.शाहु महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणत मार्गक्रमण करीत असल्याचे डॉ.दिपाली कांबळे, पशुधन विकास अधिकारी यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

  गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ.दिपाली कांबळे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या