💥संभाजीनगर (औरंगाबाद) मधील पाणीपट्टी अर्ध्यावर म्हणजे २००० रूपये केल्याची पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा....!


💥टीव्ही सेंटर हडकोतील छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयोजित तीन दिवसीय शंभूराजे महोत्सवात पालकमंत्री बोलत होते💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजीनगर शहराचा कायापालट केलेला आहे. आजघडीला रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, नियमित बस सेवा, नाट्यगृहे, सुरक्षा यासारख्या कितीतरी गोष्टींवर काम झाले असून शिवसेनेच्या या कार्यामुळे विरोधकांचे पोटशूळ उठत आहे. लोकांना भडकवण्याचे काम विरोधक करत आहेत. विविध मार्गाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विरोधकांना धडा शिकवण्याचे आदेश या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांना देखील पाणीप्रश्नी दिलासा मिळावा म्हणून जोपर्यंत समाधानकारक पाणी देऊ शकत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणजे 2000 रूपये करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सबुरीने घ्या, शिवसेना आपल्या विश्वासास कधीच कमी पडणार नाही, अशी ग्वाही संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 


टीव्ही सेंटर हडको येथील छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयोजित तीन दिवसीय शंभूराजे महोत्सवात पालकमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई ,संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संयोजक तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले,  हभप नवनाथ महाराज आंधळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हिंदू जगू शकले, अन्यथा सुन्नत झाली असती. आज काही अक्करमाशी लोक त्या औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होताना आपण पाहत आहोत. शिवसैनिकांसह राष्ट्रप्रेमी लोक त्यांचा निषेध करतात. 

वर्ष १९८६ मध्ये बाळासाहबांनी याठिकाणच्या जनतेला विचारले औरंगजेब तुमचा कोण होता, तेव्हा जनतेने तो आमचा कोणी नव्हता अशी गर्जना केल्यावर साहेबांनी या शहराला संभाजीनगर असे नाव दिले. सत्ता आल्यावर त्यांनी संभाजीनगर असे नामकरण करण्याचे आदेश दिले पण कोर्टात हा विषय अडकला. जे त्या औरंग्याच्या थडग्यासमोर नतमस्तक होतील त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील असा शाप संभाजनगरकर देत आहेत. आम्ही संभाजीनगरच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि काही लोक विनाकारण रान उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांची माथी फिरवण्याचे उद्योग करत आहेत', असाही टोला त्यांनी लगावला. पाणीपट्टी अर्ध्यावर आज मी व्यक्तिशः पाणीप्रश्नी विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली. समन्यायी पाणी वाटप करण्याच्या सूचना देताना जोपर्यंत आपण नागरिकांना पुरेसे अर्थात समाधानकारक पाणी देऊ शकत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के म्हणजेच दोन हजार वर्षाला घेण्याचे आदेश दिले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे अतिशय समर्पक असे काम करत आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे, एक आठवड्यात पंधरा दशलक्ष लिटर पाण्याची वाढ संभाजीनगरला मिळणार आहे. त्यामुळे पाणीप्रश्नी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव कोणी आणण्याचा प्रयत्न करून नये, त्यांच्या अंगावर धावून जाऊ नका, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आहे, कायदा हातात घेतल्यास त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करायला लागेल, असेही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी संयोजक तथा आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे महोत्सवाचा लाभ घेणाऱ्या संभाजीनगरवासीयांचे आभार मानले. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, सहसंपर्क संघटक  सुनिता देव, उपजिल्हा संघटक मीना फसाटे, जयश्री लुंगारे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, उपशहर प्रमुख संदेश कवडे, सुरेश कर्डिले मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, राजू इंगळे, किशोर नागरे, धर्मराज दानवे, ज्ञानेश्वर शेळके, गौरव पुरंदरे आदी उपस्थित होते.

'गंध मराठी मातीचा'च्या सादरीकरणावर रसिक फिदा 

यावेळी आरती क्रिएशन प्रस्तुत 'गंध मराठी मातीचा' या महाराष्ट्राच्या लोकनृत्यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात 'पहिले नमन करितो वंदना' या गीताने झाले. 'वासुदेव आला हो वासुदेव आला' आणि जात्यावरच्या ओवी सादर करण्यात आल्या. 'माझ्या राजाचे राजपण कालपण, आजपण, उद्यापण' या छत्रपती शिवरायांवर आधारित गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. नागपूरहून आलेल्या महिला कलावंतांनी यावेळी बैठकीची व खडी लावणी सादर केल्या. बतावणी या सदरात कलावंतांनी एकाहून एक विनोद करत उपस्थितांना खिळवून ठेवले. 'श्रावणाचे ऊन मला सोसेना', 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा'  या लावण्यांना रसिक श्रोत्यांनी वन्स मोअर म्हणत दाद दिली. या कार्यक्रमाचे नियोजन आरती पाटणकर यांनी तर नृत्य दिग्दर्शन आकाश वाघमारे, उमेश चाबुकस्वार यांनी केले.  

नृत्यवंदनेने रसिक मंत्रमुग्ध 

छत्रपती शंभूराजे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात कलाश्री अकादमीच्या विक्रांत वायकोस यांच्या चमूने छत्रपती संभाजीराजेंना शास्त्रीय आणि लोकनृत्यातून नृत्यवंदनेने झाली. 

सूर निरागस हो.. गणपती

सूर निरागस हो..

शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक..

शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक..

या भरतनाट्यात गणेशवंदनेच्या सादरीकरणाने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यानंतर मधुराष्टकम्, कृष्णशब्दम आणि विठ्ठलस्तुती सादर करण्यात आली. मधुराष्टकम्मध्ये कलावंतांनी 

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं...

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं... 

हे गीत सादर केले. तर लोकनृत्यात आईचा गोंधळ व जोगवा यावेळी सादर करण्यात आले. यावेळी कलाश्री अकादमीचे संचालक तथा नृत्यदिग्दर्शक विक्रांत वायकोस, सह दिग्दर्शन भक्ती देशपांडे यांनी दर्जेदार नृत्य सादरीकरणाचे नियोजन केले. रेणुका गठडी, आर्या शहा, नंदना नायर, पूर्ती पाटील यांनी शास्त्रीय व लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली कुलकर्णी यांनी केले. 

शनिवारी 'छावा'चे सादरीकरण 

छत्रपती शंभूराजे महोत्सवाचा समारोप ऐतिहासिक नाट्यप्रयोग 'छावा' या नाट्याने होईल. १४ मे अर्थात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता लेखक-दिग्दशर्क महेंद्र महाडिक यांचे 'छावा' हे भव्यदिव्य नाट्य प्रत्यक्षात पाहण्याची व अनुभवायची संधी संभाजीनगरवासीयांना मिळणार आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य नाट्यप्रयोगात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या