💥परभणी जिल्ह्यात मान्सुनपुर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने डेंग्यु हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात...!


💥जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आवाहन💥

परभणी (दि.१७ मे २०२२) : डेंग्यूचा ताप हा दोन ते सात दिवस टिकणारा तीव्र ज्वरीय आजार आहे. ज्यात दोन किंवा अधिक लक्षणे दिसून येतात. प्रामुख्याने यात डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, स्नायुदाह, सांधेदुखी, पुरळ, उघड दिसून येणारा रक्तस्त्राव व रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे याप्रकारची दिसून येतात. सध्या वाढत्या संशयीत डेंग्यु रुग्ण व पारेषण काळ सुरु होत असल्यामुळे मान्सुनपुर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने डेंग्यु हा आजार टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी व जिल्हा शल्यचिकित्सक परभणी, जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी व जिल्हा हिवताप अधिकारी परभणी यांनी केले आहे.

  प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये कोरडा दिवस पाळणे यामध्ये एडीस इजिप्ती या डासाचे जीवनचक्र आठ दिवसाचे असल्यामुळे म्हणजे पाण्यात अंडी घातल्यापासुन आठ दिवसात डास तयार होऊन हवेत उडतात. त्यामुळे गावांमध्ये, प्रभागांमध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा. सर्व भांडी घासुन पुसून स्वच्छ करून ती दोन तास उन्हांमध्ये वाळवुन मगच त्यामध्ये पाणी भरावे. पाणी भरल्यानंतर ती भांडी झाकुन ठेवावीत.  किटकशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये  किटकशास्त्रीय निर्देशांक एच.आय, सी.आय, बी. आय. हे धोक्याच्या पातळीवर आढळुन आल्यास त्या संपुर्ण कार्यक्षेत्रात कंटेनर सर्वेक्षण करुन घ्यावे,  ज्या कंटेनरमध्ये अळ्या आढळुन आलेल्या आहेत ते कंटेनर रिकामे करावे व जे कंटेनर रिकामे करता येत नाहीत त्यामध्ये टेमीफॉस या अळीनाशकाचा वापर करण्यात यावा.  अळया असलेले पाणी गटारीत ओतु नये तर जमीनीवर सांडून द्यावे.  गावातील परिसरातील टायर, फुटके डब्बे, रिकामे नारळ असे सर्व निरोपयोगी वस्तुची विल्हेवाट लावावी. तुंबलेली गटारे, साचलेले पाणी वाहते करावे. खड्डे बुजावेत व इतर ठिकाणी आढळुन येणाऱ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी माश्यांचा वापर करण्यात यावा. उद्रेकाची स्वरूप व व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आढळुन आल्यास तेथे धुर फवारणीच्या दोन फेऱ्या आयोजित कराव्यात.

            घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.  एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवुन ठेऊ नये.  आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणीसाठे रिकामे करुन, घासून, पुसून घेवून कोरडी करुन नंतरच पाणी भरावे. टायर आणि निरुपयोगी, तुटलेल्या घरगुती वस्तू, छतावर ठेवू नये. त्यामध्ये  पावसाचे पाणी  साठुन राहुन डासोत्पती होत असते त्यामुळे या सामानाची विल्हेवाट लावावी.

              झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.  वैयक्तिक संरक्षणासाठी डासांना पळवुन लावणाऱ्या साधनांचा वापर करावा. नाली व गटारे वाहती ठेवावीत जास्त काळ पाणी साठुन राहत असल्यास त्यामध्ये जळालेले तेल, वंगण, केरोसीन टाकावे. पाण्याची डबकी, तळे या ठिकाणी डास अळ्यांना खाणाऱ्या डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. तापाचा रुग्ण आढळुन आल्यास त्यास तात्काळ दवाखान्यात जावून आवश्यक तो उपचार घ्यावा. याप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास किटकजन्य रोग हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या यांचा प्रसार रोखण्यास निश्चितच मदत होईल. प्रत्येक ग्रामपंचायतीने धुर फवारणी यंत्र व ॲबेट खरेदी करावेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णकल्याण समितीमधून धुर फवारणी यंत्र व  5 लिटर ॲबेट खरेदी करावेत. असे जिल्हा हिवताप अधिकारी परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या