💥मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी....!


💥कोकणातील पत्रकार उद्या १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदनं देणार💥 

मुंबई : कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील सर्व तालुक्यातील पत्रकार उद्या स्थानिक पातळीवर तहसिलदारांना निवेदनं देऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिली.

पत्रकारांनी सातत्यानं सहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले.. काम रखडलयानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता.. पत्रकार लढत होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष मूग गिळून गप्प होते.. मात्र आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना अनेक नेते श्रेय लाटण्यासाठी समोर येत आहेत तसेच काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं सूचवून मोडता घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे..

बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे..

विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावं दिली जात असतात.. मुंबई - गोवा महामार्गाला एक पत्रकार, विचारवंत, समाजसुधारक असलेल्या बाळशास्त्रींचे नाव देऊन औचित्य साधावे असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे..

मुंबई - गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातल्या तीनही जिल्ह्यातील पत्रकार तालुका पातळीवर तहसिलदारांना निवेदनं देणार आहेत. सर्व पत्रकार मित्रांनी उद्या बाळशास्त्री यांच्या पुण्यतिथी दिवशी निवेदनं देऊन आपली मागणी पुढे रेटावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक (सिंधुदुर्ग) जान्हवी पाटील, श्रीकृष्ण देवरूखकर (रत्नागिरी) विजय मोकल, भारत रांजणकर, शशिकांत मोरे (रायगड) आदिंनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या